कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद!

 

सगळ्यात मोठा उद्योजक म्हणजे भारतातील शेतकरी

चिपळूणमधील जिल्हा फेडरेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

चिपळूण (संतोष सावर्डेकर):- कोकणी माणसाला विशेष म्हणजे मराठी माणसाला उद्योग करता येत नाही, असे म्हटले जाते. मात्र, फेडरेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात कोकणातीलच पाच जणांचा सन्मान होत आहे. या कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवद्गार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमाप्रसंगी केले.

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज रत्नागिरी जिल्हा उद्योग विकास परिषद अंतर्गत उद्योजकता पुरस्कार २०२४ हा कार्यक्रम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात नुकताच झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे व उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे होते.

या कार्यक्रमाप्रसंगी फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच पुरस्कारप्राप्त उद्योजक व मान्यवरांचे स्वागत केले. याचबरोबर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांचे चिपळूण नागरीतर्फे स्वागत केले. चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव व सीए मयुरेश प्रशांत पटवर्धन यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांच्या वाटचालीची माहिती देताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

या कार्यक्रमात जिल्हा फेडरेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने गद्रे मरीन एक्सपोर्टचे दीपक गद्रे, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, जागतिक उद्योजकता पुरस्काराने स्कॉन प्रोजेक्टचे चेअरमन उद्योजक निलेश चव्हाण, रत्नागिरी जिल्हा उद्योजकता सामाजिक पुरस्काराने घरडा केमिकल्स कंपनी, जिल्हा उद्योजकता पुरस्काराने डिलाईट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अनिल देवळे यांना माजी मंत्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू पुढे म्हणाले की, जगाला काय हवे याचा शोध घेऊन उद्योग सुरू केल्यास तो कायम टिकतो. या पाच जणांनी जगाची गरज ओळखून उद्योग सुरू केल्याने ते जागतिक पातळीवरचे उद्योजक होऊ शकले आहेत. कोकणी माणूस मनात आणले तर काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श हे पाच जण आहेत. त्यामुळे असे कीर्तीवान उद्योजक घडले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशात बऱ्याच बाबी उलट आहेत. आज १४ टक्के शेतकरी उत्पन्न घेतो आणि ६५ टक्के म्हणजे ८० कोटी लोकांना तो धान्य पुरवतो. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणजे उलटी झाली पाहिजे. जगाचा पोशिंद असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकरी टिकला तरच सर्वांचे भले आहे, याचा विचार झाला पाहिजे असे सांगतानाच खऱ्या अर्थाने शेतकरी हा उद्योजक आहे. तो धोका पत्करून आपली शेती करीत असतो. यामुळे शेतकऱ्यांचा देखील वेळोवेळी सन्मान झाला पाहिजे, असे मत शेतकऱ्यांप्रती प्रभू यांनी मांडले. तर ते पुढे म्हणाले की, सामाजिक प्रश्नाला आपण मागे सारले आहेत. त्यामुळे त्यांचा डोंगर झाला असून ते सोडवण्याची गरज असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच पुरस्कारार्थी उद्योजक दीपक गद्रे यांनी हा पुरस्कार कंपनीतील सर्वांचा असल्याचे मत मांडले. उद्योजक प्रशांत यादव यांनी हा पुरस्कार आपल्या सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांना समर्पित करतो, अशी भावना मांडली. निलेश चव्हाण यांनी आपल्या घरच्या लोकांनी पाठीवर मारलेली शाबासकीची थाप यासारखा कोणताही सन्मान नाही, असे मत मांडले. पुरस्कारार्थी अनिल देवळे यांनीही आपले मनोगत मांडले. याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे व घरडा कंपनीचे अनिल भोसले यांनी देखील आपले मनोगत मांडले.

यावेळी व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त उद्योजकांसह, चिपळूण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, माजी आमदार डॉ विनय नातू, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, सचिव केशव भट, उपाध्यक्ष राजू सावंत, माजी आमदार रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला सौ. उमा सुरेश प्रभू, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक रवींद्र भोसले, सत्यवान मामुनकर , सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कदम, सुरेश साठे, विनंती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन तर सूत्रसंचालन प्रा. सौ. डॉ. मीनल ओक यांनी केले.