मराठा समाज सेवा संघ , राजापूरच्या वतीने गुणगौरव समारंभ संपन्न
राजापूर (वार्ताहर): आज तुम्ही यशवंत झाला आहात आता अधिक मेहनत करुन गुणवंत व्हा मग नकीच तुम्ही पुढच्या आयुष्यात किर्तीवंत व्हाल असे प्रतिपादन मराठा समाज सेवा संघ राजापूरचे अध्यक्ष प्रकाश पवार यानी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी केले.
राजापूर हायस्कूलच्या कलामंदीर सभागृहात नुकताच मराठा समाज सेवा संघाच्या वतीने मराठा समाजातील इयत्ता १० व १२ वी परिक्षेत यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. पवार बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व मराठा समाज सेवा संघाचे जेष्ठ सदस्य जगदिश पवार, राजापूरातील प्रतिथयश विधीतज्ञ अॅड. राहुल राणे, अॅड. गुरुदत्त खानविलकर, राजापूर पंचायत समितीचे माजी सदस्य एकनाथ लाड, भाइ गुणीजन, मराठा समाज सेवा संघाच्या उपाधक्षा हर्षदा खानविलकर, प्राची शिर्के, धोपेश्वरच्या उपसरपंच सौ. ओगले मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजापूर तालुक्यात मराठा समाजातील इयत्ता दहावी व बारावी च्या परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मराठा समाज सेवा संघाच्या वतीने प्रशस्तीपत्रक देवुन गौरव करण्यात आला. मराठा समाजातुन तालुक्यात इयत्ता दहावी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावी मधुन कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतुन प्रथम द्वितीय व तृतिय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व मराठा समाज सेवा संघाचे जेष्ठ सदस्य जगदीश पवार यानी जो माणुस काहीच करत नाही त्याची जगाला कधीच गरज नसते मात्र जो सतत काहीतरी करत असतो त्याची जगाला सातत्याने गरज असते त्यामुळे आयुष्यात काहीतरी करत रहा मग तुम्ही जगाच्या गरजेचे असाल असे प्रतिपादन केले. तर भविष्यात आपल्यातील कलागुण ओळखुन व आपली आवड जपत पुढील क्षेत्र विद्यार्थ्यानी निवडले पाहिजे असेही त्यानी यावेळी सांगितले. या कार्यक्रमावेळी मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सदस्य प्रकाश सावंत, उमेश दळवी, अरुण नलावडे विलास शिंदे व मराठा बांधव उपस्थित होते .
या कार्यक्रमादरम्यान डॉ. सागर पाटील, जगदिश पवार, जितेंद्र खामकर, भालचंद्र पवार, नंदकुमार पवार, एकनाथ चव्हाण, ठेकेदार संघटनेचे नरेश दसवंत, सेवानिवृत्त शिक्षिका प्रणोती भोसले आदी मान्यवरांचा मराठा समाज सेवा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
या गुणगौरव कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा समाज सेवा संघाचे सदस्य राजन लाड यानी केले तर मराठा समाज सेवा संघ, राजापूरचे सचिव विनोद पवार यानी आभार मानले.












