चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी तर दुसरा ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने वाहतुकीवर परिणाम
संतोष कोत्रे | लांजा-: आसगे तळवडे मार्गावर कुरचुंब येथील चढावाच्या ठिकाणी एक चिरा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने व दुसरा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने या रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे.केवळ छोट्या वाहनांना ये-जा करण्यासाठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे या मार्गावरील मोठी वाहने पूर्णपणे अडकून पडली आहेत. आज दुपारी ही घटना घडली आहे.
. लांजा सांगे तळवडे कुरचुंब मार्गे हा रस्ता हा अवजड वाहनांमुळे अतिशय धोकादायक बनला आहे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरून जांभ्या चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची संख्या वाढीस लागली आहे. यापूर्वी एका सोळा चाकी ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत गोविळ येथील दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा रस्ता मोठ्या चिरे वाहतूक करणार्या ट्रकमुळे अतिशय धोकादायक बनला असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
आज मंगळवारी चिरे वाहतूक करणारा ट्रक हा आसगे तळवडे कुरचुंब मार्गावरील तीव्र उताराच्या ठिकाणी रस्त्यावर बंद पडला होता. त्याला नेण्यासाठी आलेला दूसरा ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटी झाल्याने या मार्गावरील मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद होवून वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी किंवा रिक्षा सारखी छोटी वाहने या ठिकाणी जात आहेत ही घटना आज दुपारी घडली आहे.. त्यामुळे या रस्त्यावरील चिरा वाहतुकीत आणि रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे. आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.












