ग्रामीण पोलिसांची चोख कामगिरी ! चोरीला गेलेल्या रेल्वे रुळाच्या 223 चाव्या 48 तासात हस्तगत 

 

दोन संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी l प्रतिनिधी :काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वे विभागाच्या पानवल ब्रिज ते कोंडवी या परिसरातील रेल्वे रुळाच्या 12 हजार रुपयांच्या चोरीस गेलेल्या लोखंडी चाव्या 48 तासांच्या आत दोन संशयित महिलांकडून ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केल्या.

 

 

याप्रकरणी रेल्वेचे कर्मचारी रविंद्र चंद्रकांत पावसकर (46,रा.कोंडवी पोस्ट चांदेराई,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षेच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. या पथकांमार्फत तपास करत असताना कोंडवी गावच्या पोलिस पाटिल प्रेरणा दळवी तसेच चांदेराई ईब्राहिमपट्टण गावचे पोलिस पाटील विलास शिवगण यांनी गावात फिरणार्‍या अनोळखी भंगार गोळा करणार्‍या संशयित महिलांची माहिती दिली. पोलिस पथकांमार्फत त्या महिलांचा शोध घेउन कौशल्याने तपास केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रेल्वेच्या चोरीला गेलेल्या 223 लोखंडी चाव्या हस्तगत करण्यात आल्या.

 

 

ही कामगिरी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार एम.आर.कांबळे, एस.बी कांबळे, एम.एम.सावंत, पोलिस हेड काँस्टेबल ए.जी.कांबळे, आर.डी.पावसकर, बी.बी.सवाईराम, यु.व्ही.गायकवाड, आर.आर.भिसे, महिला पोलिस हेड काँस्टेबल टि.आर.सावंतदेसाई, महिला पोलिस नाईक वाय.एस.नाटुस्कर, पी.ए.रहाटे यांनी केली.