भाजपा बुथ कमिटीच्या माध्यमातुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गाव व वाडीवस्तीवर पोहचवा-राजेश सावंत

भाजपा राजापूर तालुका कार्यकारणी बैठकीत घेतला संघटनात्मक आढावा

खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरेंच्या अभिनंदनाचा ठराव

राहुल गांधीच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा जाहिर निषेध

राजापूर (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपा संघटन अधिक बळकट करताना बुथ सक्षमिकरण करून या बुथ च्या माध्यमातुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गावा व वाडीवस्तीवर पोहचवा असे आवाहन भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी येथे केले.

बुधवारी राजापुरात भाजपा राजापूर तालुका कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सावंत यांनी संघटनात्मक आढावा घेत मार्गदर्शन केले. तशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी दिली आहे. या बैठकीचे नियोजन नागरेकर यांनी केले होते. भाजपा तालुका संपर्क कार्यालयात ही बैठक झाली.
यावेळी बोलताना सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपा संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. यासाठी नवीन बुथ, शक्तीकेंद्र रचना कराव्यात असेही नमुद केले. तर नवीन मतदार नोंदणी मोहिम राबवावी असेही त्यांनी सांगितले. भाजपा बुथ कमिटीच्या माध्यमातुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गावा व वाडीवस्तीवर पोहचवा, यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र उपलब्ध करण्यासाठी मदत करा असे आवाहनही सावंत यांनी केले.

 

यावेळी सावंत यांनी तालुक्यातील विकासात्मक कामांचाही आढावा घेतला. तर लोकसभा व पदविधर मतदार संघ निवडणूकीत चांगले काम केल्याबद्दल भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले.
या बैठकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन भाजपाचे नवनिर्वाचित खासदार म्हणून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल तसेच पदविधर मधून निरंजन डावखरे हे देखील मोठया मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. तर लोकसभेत हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.

 

या बैठकीला पक्ष निरीक्षक डॉ. निमणकर यांसह भाजपा महिला आघाडीच्या सौ. उल्का विश्वासराव, भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, राजापूर पश्चिम मंडल तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, पुर्व मंडल तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, महिला आघाडी अध्यक्षा सौ. सुयोगा जठार, सौ. शृती ताम्हनकर, प्रभावती कानडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अरविंद लांजेकर, सागर शिंदे, मोहन घुमे, स्वप्नील गोठणकर, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गोठणकर, प्रकाश मांडवकर, दिपक बेंद्रे, समिर खानविलकर, अमोल सिनकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या या बैठकीला भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते. मात्र त्यांना मुंबईत एका तातडीच्या बैठकीला उपस्थित रहावे लागणार असल्याने ते येऊ शकले नाहीत, मात्र लवकरच निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती नागरेकर यांनी दिली आहे.