As the summer heats up, the wildlife rushes for water
पाटपन्हाळे | वार्ताहर : उन्हाची तीव्रता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भाक्ष असल्याने माणसांसह पशु पक्ष्यांचीही तडफड होत आहे. पाण्याच्या शोधात रस्त्यावर येणारे वन्यजीव वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडलेली दिसत आहे. सध्या तीव्र उन्हाच्या चटक्याने प्रत्येकाची तहान वाढलेली असुन पाण्याची गरज सगळ्यांना भासत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने माणसाचीच परवड होते तर पशु पक्ष्यांची तडफड सुरू आहे. उन्हाचे चटके बसत आहेत याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. हातपंप किंवा टाकीच्या साठलेल्या डबक्यात पाणी पिण्यासाठी खारुताई, चिमणी, कावळा, बगळे आदी पक्षी प्राणी त्याच बरोबर अगदी दुर्मिळ असणारे पक्षी पाण्याच्या शोधात दिसुन येतात. वनक्षेत्रात पाण्याचे साठे कोरडे झाल्याने एरवी जंगल परिसरात बागडणारी हे प्राणी आता पाण्याच्या शोधात भटकत आहेत. जंगलातील वन्यजीव हे नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असुन वनविभागाच्या वेळ काढूपणामुळे अनेक पाणवठे ओस पडले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पाणथळ ठिकाणे व गवताळ प्रदेश कमी होत चालले आहेत त्यामुळे प्राणी पक्षी संकटात येवू लागले आहेत.