शाहीर मंडळी व हितचिंतकांनी दिल्या वाढदिवशी शुभेच्छा
चिपळूण (वार्ताहर) : लोककलेत दीर्घकाळ सेवा करणारे लोकशाहीर आणि सध्या वारकरी संप्रदायामधून कीर्तन सेवा बजावणारे चिपळूण वालोपे येथील शाहीर ह भ प दत्ताराम आयरे यांचा 74 वा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण यांच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शक्ती तुरा लोककला जोपासणारे एक अभ्यासू शाहीर म्हणून दत्ताराम आयरे यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख आहे. ज्या काळात कोणत्याही सुविधा नव्हत्या अशा वेळी शक्ती तुरा ही लोककला श्री. ह भ प आयरे यांनी तळागाळात पोचवण्याचे काम केले. शक्ती तुरा कलेतील त्यांची जुगलबंदी ही नेहमीच पाहण्यासारखी होती. त्यांचा पहाडी आवाज आणि विषयाला पटवून देणारी काव्य यामुळे त्यांची आजही रसिक आठवण काढतात. त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेत त्यांना जीवनगौरव आणि शिलेदार असे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारे लोकशाहीर श्री. आयरे यांचा गुरुवार दिनांक ४ जुलै रोजी त्यांचा ७४ वा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी कलगी तुरा समाज उन्नती मंडळाचे सल्लागार अभयदादा सहस्रबुद्धे, मंडळाचे सचिव वैभव पवार, सुनील घाणेकर, राजेंद्र जाधव, शशिकांत पवार, अनिल जाधव चिपळूणचे सर्व पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी बांधव यांनी प्रत्यक्ष येऊन दत्ताराम आयरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी त्यांची शिष्या मंडळी, सर्व शाहीर, वारकरी अशा अनेजणांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.












