खेड(प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यातील १५ पैकी ७ विधानसभा मतदार संघात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. राज्यात २८८ पैकी २०० ते २२५ जागा मनसे स्वबळावर लढणार असल्याचे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी गुरुवारी मुंबईत जाहीर केले.
राज्यात लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान यांना पाठिंबा दिला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र भावनाही उमटल्या होत्या. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी बोलावून समजूत काढत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा जोरकसपणे प्रचार केला होता. मात्र आता मनसेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली असून तशी व्यूहरचनाही आखण्यात आली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ३ जिल्हयात विधानसभेच्या १५ जागा येतात. त्यातील सर्वाधिक जागा रायगड जिल्ह्यात आहेत. यातील महाड व श्रीवर्धन या ठिकाणी मनसे उमेदवार उभे करणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ जागा मनसे स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.










