चिपळूण : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये मिळणार आहेत. १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे जमा करून ऑनलाईन फॉर्म भरावयाचे आहेत. चिपळूण तालुक्यातील सर्व गावांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची परिपूर्ण माहिती मिळावी तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला ग्रामसभा लागणे गरजेचे आहे. या महिला ग्रामसभेमधून महिलांना परिपूर्ण माहिती मिळेल व जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा लाभ सर्व घटकांतील महिलांना मिळेल यासाठी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांना आवाहन करावे यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती चिपळूण यांना भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी निवेदन दिले.
सहाय्यक प्रशासन अधिकारी आर. जी. चौरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा विस्तारक प्रसन्ना जाधव, जिल्हा चिटणीस संतोष मालप, संतोष वरेकर, गणेश हळदे, तालुका उपाध्यक्ष संदीप सुखदरे, ओंकार बापट, तालुका सरचिटणीस एकनाथ सहस्रबुद्धे, बूथप्रमुख राहूल जाधव उपस्थित होते.











