राजापूर नगर वाचनालयाच्या प्रगती व उन्नतीसाठी कटीबध्द – प्रभात पाध्ये

राजापूर (प्रतिनिधी): दिडशे वर्षांहुन अधिक काळाची समृध्द परंपरा असलेल्या राजापूर नगर वाचनालयाची भविष्यातही चांगली प्रगती व्हावी, समस्त वाचकांना समृध्द होता येईल असे साहित्य या वाचनालयाच्या माध्यमातुन वाचकांना उपलब्ध करून देताना या वाचनालयाच्या उन्नतीसाठी आपण कटीबध्द असू अशी ग्वाही राजापूर नगर वाचनालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभात पाध्ये यांनी दिली.

 

 

नुकत्याच झालेल्या राजापूर नगर वाचनालय राजापूर वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२५-२९ या पाच वर्षाकरिता नूतन कार्यकारी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रभात पाध्ये यांची निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला.
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेत आता वाचकांची संख्याही वाढली आहे. ५०० च्या वर वाचक संख्या झाल्याने व त्यापुढे प्रत्येक १०० वाचकामागे एक या प्रमाणे संचालक घेण्याबाबत नियम असल्याने व या वाचनालयाच्या माध्यमातुन या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना काम करता यावे म्हणून सध्याची संचालक संख्या सात वरून नऊ करण्याचा ठराव पारीत करण्यात आला व नव्या कार्यकारिणीत तसा बदल करताना नऊ संचालक निवडण्यात आल्याचे पाध्ये यांनी सांगितले.

 

 

मागील कार्यकारिणीने केलेल्या चांगल्या कामांचा गौरव करताना नगर वाचनालयाची झालेली प्रशस्त इमारत हे जुन्या कार्यकारणीचे मोठे काम असून यासाठी मावळते अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे पाध्ये यांनी सांगितले. भविष्यात या वाचनालयाच्या माध्यमातुन वाचन संस्कृती अधिक बळकट करताना राजकिय, सामाजिक, अर्थ जगत यावरिल विषयांची दर्जेदार प्रकाशकांची व लेखकांची पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे पाध्ये यांनी सांगितले. तर शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक ती पुस्तके वाचनालयाच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे पाध्ये यांनी सांगितले. तर सोलर पॅनेलच्या माध्यमातून वाचनालयात वीज व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात विज देयकापोटी होणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. तसे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दिडशे वर्षाची परंपरा असलेले हे वाचनालय राजापूरची शान असून ती शान अधिक वाढविण्यासाठी जपण्यासाठी वाचक आणि तमाम राजापूरक रांचे विश्वस्त म्हणून आंम्ही काम करू अशी ग्वाहीही पाध्ये यांनी दिली.
याप्रसंगी कार्यवाहक जयंत अभ्यंकर, सहकार्यवाह सुहास ओळकर, संचालक जयेश हर्डीकर आदी उपस्थित होते.