४८ तासात पोलिसांकडून एकही अधिकृत माहिती दिली नाही

मिरजोळे एमआयडीसी येथील घटनेचे प्रशासनाला गांभीर्य नाही का ?
नागरिकांचा सवाल

रत्नागिरी । प्रतिनिधी
मिरजोळे एमआयडीसी येथे गोवंशाचे शीर रस्त्यावर सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद रत्नागिरीसह सर्वत्र उमटले. मात्र घटनेला ४८ तास उलटून गेले तरीही रत्नागिरी पोलिसांकडून कोणताही ठोस तपास झाल्याचे पुढे आलेले नाही. तर घटना अत्यंत संवेदनशील असतानाही पोलीस विभागाच्या राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी कोणीही न उपस्थित राहिल्याने त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही.

मिरजोळे एमआयडीसी येथील रस्त्यावर गोवंशाचे शीर सापडल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदू समाज तेथे एकत्र आला होता. ही एकजूट गेले तीन दिवस कायम आहे. ही घटना म्हणजे गो तस्करीचा प्रकार असून असेच अनेक प्रकार सातत्याने रत्नागिरीत घडत आहेत आणि त्याचा तपास सखोल होत नाही अशा तीव्र प्रतिक्रिया रत्नागिरीकराकडून उमटत आहेत. ४८ तासात पोलिसांकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट देण्यात न आल्याने वेगवेगळ्या गोष्टी प्रसारित होताना दिसत आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे.

हा तापास अतिशय सखोल होईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी घोषित केले होते मात्र या तीन दिवसांमध्ये राज्य स्तरावरील किंवा कोकण प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे फिरकलेले सुद्धा दिसलेले नाहीत. या तपासात कोणतही त्रुटी असेल तर पोलीस दलाच्या वरिष्ठांना यात लक्ष घालायला सांगू असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले होते मात्र ही घटना प्रशासनाने अद्यापही गांभीर्याने घेतलेली नाही अशीच भावना आता रत्नागिरीकरामध्ये निर्माण होताना दिसत आहे.

दरम्यान रविवारी याच भावानेच उद्रेक होऊन सकाळी ११ वाजता मारुती मंदिर येथून पोलीस अधीक्षक कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस तपास झाला नाही तर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यात नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.