राजापुरात मुसळधार.. जनजीवन विस्कळीत अर्जुना आणि कोदवली नद्यांनी ईशारा पातळी ओलांडली

पुराचे पाणी जवाहर चवाहरचौकात शिरण्याच्या शक्यतेने व्यापारी नागरिक सतर्क

वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजपुरवठा खंडीत

प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा

राजापूर (वार्ताहर): शनिवारी सायंकाळपासून शहर आणि तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात रविवारी एकुण ७३४ मिमी तर सरासरी ९१.७५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर एकुण १०४६.४२ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. मात्र तालुक्यात कुठेही पडझडीच्या घटनेचे वृत्त नाही.
कोदवली व अजुर्ना नद्यांनी ईशारा पाततळी ओलांडली असल्याने प्रशासनाकडून नदीकिनाऱ्यालगतच्या नागरीक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर वरचीपेठ चिंचबांध मार्ग व बंदरधक्का परिसर अर्जुना नदीतील पुंडलिक मंदिर परिसरही पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर शिळ गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर ग्रामीण भागात काही रस्त्यांवर पाणी आले आले आहे.

 

काहिशा विश्रांतीनंतर शनिवार पासून राजापूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी नदी नाले भरून वाहत असून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नदया दुथडी भरून वाहू लागल्या असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोदवली नदीच्या पात्र भरून वाहून लागल्याने जवाहरचौक परिसरात पाणी शिरू लागले आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने पहाटे कोदवली नदीच्या पाण्याने जवाहरचौक पिकअपशेड पर्यंत मजल मारली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यावर सकाळी पाणी ओसरले. दरम्यान रविवारी दुपारनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने पुराचे पाण्याने जवाहरचौकाच्या दिशेने कुच केली आहे.
तर दोन दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे भातलावणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. राजापूर तालुक्यात दोन दिवसांत संततधार पाऊस पडत असून या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

 

रविवारी राजापूर मंडळ 135 मिमी, ओणी मंडळ 74 मिमी, कुंभवडे मंडळ 44 मिमी
नाटे मंडळ 96 मिमी, जैतापूर मंडळ 127 मिमी, कोंडये तर्फे सौंदळ 63 मिमी, पाचल मंडळ 124 मिमी, सौंदळ मंडळ 71 मिमी एकूण पाऊस 734.00 मिमी तर सरासरी 91.75 मिमी पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आजपर्यंत एकुण सरासरी 1046.42 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अर्जुना आणि कोदवली नदयाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने जवाहरचौकाकडे आगेकुच सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी सतर्क झाले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे.

 

गाळ उपशामुळे दिलासा
गेल्या दोन वर्षात राजापूर शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ महसुल प्रशासन, राजापूर नगर परिषद व लोकसहभाग यातुन नाम फाउंडेशनने काढण्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन या गाळ उपशासाठी सुमारे ७० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यामुळे यावर्षी अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असली तरी जवाहर चौकात पुराचे पाणी न शिरल्याने हा गाळ उपशाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे.