आंबोली हाऊसफुल्ल : पर्यटकांची तोबा गर्दी

वाहतूक सुरळीत करताना पोलिसांवर ताण

आंबोली । प्रतिनिधी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली आंबोली आज रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाली. या गर्दीमुळे आंबोली-बेळगाव राज्यमार्गावर मुख्य धबधबा परिसरात वाहतूक कोंडी झाली. वाहतुकीला शिस्त लावताना पोलिसांवर मात्र मोठा ताण पडला. आज दिवसभर सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने काही पर्यटक बांदा दाणोली मार्गावर अडकून पडले.


वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आज आंबोलीत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. यात स्थानिक पर्यटकांसह गोवा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे आदी भागातून पर्यटक आले. या गर्दीमुळे मात्र आंबोली-बेळगाव या राज्यमार्गावर मुख्य धबधबा परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी चोख नियोजन केले होते. पण दुपारनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. वाहतूक कोंडीच्या प्रकारामुळे पर्यटकांना गाड्या पार्किंग करून धबधब्याकडे सोडण्यात येत होते. त्यासाठी पर्यटकांना पायपीट करावी लागली.

कावळेसाद पॉईंट येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती. तेथेही पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पार्किंगबाबतही चोख नियोजन केले होते. तेथे जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने तेथेही दरवर्षीप्रमाणे वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. हिरण्यकेशी, महादेवगड येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून आणि पर्यटकांकडून दंड वसूल करण्यात आला. हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर होती.