धोपेश्वर वरचे बारसू येथे पावसाळयात स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाताना करावी लागतेय यातायात

जाणाऱ्या वाटेवर वहाळावर साकवच नाही; प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खा. निलेश राणे यांना निवेदन

राजापूर | प्रतिनिधी : शहरानजीकच्या धोपेश्वर गावातील वरचे बारसू येथे स्मशानभूमीत जाणाऱ्या वाटेवरील वहाळावर साकव नसल्याने पावसाळयात अंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय होत आहे. या वहाळावर तात्काळ साकव बांधवा अशी मागणी असूनही व ग्रामपंचायतीने त्याबाबत ठराव करून लेखी निवदने दिलेली असूनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बारसू ग्रामस्थांनी केला आहे.

या बाबत आता पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांना निवेदन दिले असून या ठिकाणी तातडीने साकव व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
धोपेश्वर गावातील वरचे बारसू येथे स्मशानभूमीत जाणाऱ्या वाटेवरील वहाळावर साकव नसल्याने पावसाळयातअंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय होत आहे. पावसाळयात या वहाळात मोठय प्रमाणावर पाणी येते. उन्हाळयात पाणी नसल्याने या वहाळातुन ये जा करता येते, मात्र पावसाळ्याच्या चार महिन्यात स्मशानभूमीत जाणे-येणे फारच कठीण व अडचणीचे होते. या कालावधीत गावात प्रेत झाले तर या वहाळातून अंत्ययात्रा नेणे हे कायमच अडचणीचे होत आहे.

त्यामुळे सदर वहाळावर साकव बांधून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. रविवारीही अशाच प्रकारे या गावात प्रेत झाले असताना या वहाळातुन प्रेतयात्रा काढताना ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. तरी या वहाळावर कायमस्वरूपी वाहतुकीसाठी साकव बांधावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबतचे आवश्यक ते ठराव व पत्र व्यवहारही ग्रामपंचायतीने केलेला आहे. मात्र अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही.

याबाबत आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांना ठरावांच्या प्रतिसह लेखी निवेदन देण्यात आले असून या ठिकाणी वहाळावर साकव बांधण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.