महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हा कार्यकारणी सभेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

 

 

जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी केले मार्गदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी):–महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाची जिल्हा कार्यकारिणीची सभा नुकतीच चिपळूणमधील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत महत्वपूर्ण ठराव करून प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना संघटनेची तालुकानिहाय पार्श्वभूमी सभागृहासमोर मांडली. लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, मंडणगड तालुक्यातील संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्यात तालुकाध्यक्ष निवडण्याचा ठराव करण्यात आला. तसेच सन २०१७ पासून ३० जून २०२४ अखेर सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुखांचा आढावा घेतला. केंद्रप्रमुख यांना प्रवासभत्ता लागू करणे बाबत केंद्रांतर्गत शाळांना भेटी देण्यासाठी यापूर्वी अर्थात २९ वर्षापूर्वी दरमहा फक्त २००/- रुपये एवढा कायम प्रवास भत्ता होता. त्यामध्ये आजपर्यंत वाढ झालेली नाही, संघटनेने मागील १४ वर्षापासून याबाबत पाठपुरावा केला आहे. आज संघटना शासन स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करून आपल्याला सुधारीत दराने दरमहा १६५० /- रुपये प्रवास भक्ता काही कालावधीतच लागू होईल असे संघटनेचे प्रयत्न आहेत. केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ पदोन्नती दिनांकापासून मिळणेबाबत, केंद्रप्रमुखांच्या कर्तव्य, अधिकार व जबाबदारी यामध्ये वाढ होत असल्याने पदोन्नतीची एक वेतनवाढ देण्यात यावी यासाठी पाठपुरावा आहे. २६ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार डिसेंबर २०२३ मध्ये नव्याने केंद्रप्रमुख पदावर रुजू झालेल्या सर्वांना पदोन्नतीची वेतनवाढ दिली आहे. मात्र काही तालुक्यातील बांधवांना अद्यापही देण्यात आलेली नाही त्याचा आढावा घेऊन वरीष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून देणे बाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रप्रमुख यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस संचित अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळावा ही मागणी दोन वर्षापासून करत आहोत. शासनाच्या अन्यायकारक असा १३ डिसेंबर २०२३ च्या निर्णयाबाबत चर्चा करून एका वर्षाला किमान १५ दिवस विशेष रजा मंजूर करून त्या त्या संचित अर्जित रजेच्या रोखीकरणाची मागणी आपले शासनाकडे केली असल्याची माहिती सभेला देण्यात आली. केंद्रप्रमुखांना निकटचे पद शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-२ असल्याने ही पदोन्नती मिळावी. त्यासाठी पदवी परीक्षेसाठी ५०% गुणाची अट रद्द करणेबाबत देखील आपले प्रयत्न चालू असलेबाबत श्री. शिर्के यांनी सांगितले.

 

केंद्र प्रमुखांचा तांत्रिक सेवेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त केंद्राचा चार्ज असलेल्या केंद्रप्रमुखांना अतिरिक्त मानधन देय असल्यास सरसकट त्यांच्या पगारातून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी जि.प. रत्नागिरी यांची भेट घेण्याचे ठरविणेत आले. ४% सादिल अनुदान २०२२/२०२३ बाबत चर्चा करताना असे दिसून आले की, अद्यापही काही तालुक्यात ४% सादिल अनुदान देण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हा परिषद रत्नागिरी कडे पत्र व्यवहार करण्यात आले आहे असे श्री. शिर्के यांनी सांगितले. तरीही अद्यापही जमा झाले नाही त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेणे बाबतचा निर्णय झाला.

 

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमा प्रा. खंडात जमा झालेल्या नाहीत. केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा पदोन्नतीने भरणे संदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुख संघटनेच्या माध्यमातून सर्व तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी महोदयांची भेट घेऊन तालुका स्तरावरील समस्या सोडविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जुलै २०२४ मध्ये मंडणगड तालुक्यापासून सुरुवात करण्याचे ठरले. नवनिर्वाचित केंद्रप्रमुख बांधवांनी संघटना लढा निधी व सभासद वर्गणी जास्तीत जास्त लवकर जमा करणेसाठी सर्व तालुका अध्यक्ष व सचिव यांनी नियोजन करावे, असे ठरविण्यात आले.

 

 

यावेळी संघटनेचे सुनिल जाधव,भगवान मोरे, प्रविण काटकर, मुस्ताक तांबे, शेषराज गर्जे, सुनिल कारखेले, संजय जंगम, श्रीकांत बापट, रामभाऊ लांडे, सुरेश कदम, विश्वास खर्डे, नामदेव लोहोकरे, जलील ऐनरकर, शशिकांत तेटांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. गर्जे यांनी केले. शेवटी सुनिल जाधव यांनी आभार मानले.