रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना जिल्हयातुन परत माघारी जाऊ देणार नाही-खा. नारायण राणे

राजापूरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खा. नारायण राणे याप्रसंगी निलेश राणे यांसह मान्यवर.
रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणारच; विरोधापेक्षा लोकांच्या पोटाचे राजकारण करा

राजापूर (प्रतिनिधी): कोकणच्या आर्थिक विकासासाठी आणि या प्रकल्पाच्या माध्यमातुन भावी पिढीला रोजागराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पुर्ण होणारच आहे. या प्रकल्पाला विरोध करून कोकणी जनतेचा घास हिरावू पहणाऱ्या यापुढे थारा नाही, जे या प्रकल्पाला विरोध करतील, विरोधासाठी येतील त्यांना परत जाऊ देणार नाही असा सज्जड ईशारा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी राजापुरात दिला. पक्षाचे राजकारण न करता लोकांच्या पोटाचे राजकारण करा असा सल्लाही यावेळी खा. राणे यांनी प्रकल्प विरोधकांना दिला.

साडेतीन लाख हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे संपुर्ण कोकणचेच नाही तर राज्य आणि देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा. राणे यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाला केवळ उध्दवमियाँचाच विरोध असल्याचा टोला लगावताना विरोध करणाऱ्यांनी कोकणी माणसाच्या भवितव्याचा, तरूणांच्या रोजागाराचा कधी विचार केलाय काय?असा खडा सवाल खा. राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या खा. राणे यांनी राजापूर शहर व परिसरातील पुरपरिस्थितीची पहाणी केली. या पहाणीनंतर राजापूर नगर नगर वाचनलयात आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उल्का विश्वासराव, प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, प्रदेश महिलास सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार व पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, जब्बार काझी, अरवींद लांजेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खा.राणे यांनी विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांचे आभार व्यक्त केले. भविष्यात आपल्याला विकास करायचा आहे असे नमुद करत विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

कोकणच्या विकासासाठी औद्योगिक प्रगती काळाची गरज असल्याचे नमुद करत राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पासाठी कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा राज्य व केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील असेही खा. राणे यांनी सांगितले. या प्रकल्पाला आता पोषक वातावरण असून विरोध नाही, याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी मी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्या उध्दवमियाँनी कोकणसाठी काय केले असा खडा सवाल उपस्थित करून राजकाराण करायचेच असेल तर लोकांच्या पोटाचे करा पक्षाचे नको असा सल्लाही त्यांनी दिला. तर जे विरोध करत आहेत त्यांचा हा विरोध तोडपाण्यासाठी असल्याचा घणाघातही खा. राणे यांनी यावेळी केला. त्यामुळे आता विरोधासाठी याल तर परत जाऊ देणार नाही असा ईशारा खा. राणे यांनी यावेळी प्रकल्प विरोधकांना दिला.
या प्रकल्पाच्या माध्यमातुन हजारो स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होणार असून यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे.

कोकणातील तरूणांनी अद्योजक बनले पाहिजे असे नमुद करताना कोकणातील उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केले पाहिजेत, शोधले पाहिजेत, त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी खा. राणे यांनी दिली.

भविष्यात आपल्याला विकासाच्या माध्यमातुन कोकणी जनतेचे जीवनमान उंचवावयाचे आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी आपण काम करायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी नम्र वागले पाहिजे, त्याचे काम केले पाहीजे असे सांगतानाच सामाजिक कार्यकर्ता कसा असतो त्याची डॉ. हेगडेवार यांनी कशी व्याख्या केली आहे हे खा. राणे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

आपण राजापुरातील पुरपरिस्थितीची पहाणी केली असून यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तर आंबेवाडी येथील कै. वासुकाका जोशी पुलाचे कामही वर्षभरात मार्गी लावण्यात येइल असेही त्यांनी सांगितले. पुरात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ते नियमाप्रमाणे देण्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी खा. राणे यांचा राजापूर अर्बन बँक, राजापूर तालुका व्यापारी संघटना यांसह अनेक संस्था व पदाधिकारी यांनी सत्कार केला. या मेळाव्याला भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.