राजापूर शहरातील पुर व पुररेषेबाबत संबधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार –खा. नारायण राणे

पुरसमस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार 
कै. वासुकाका जोशी पुल वर्षभरात पुर्ण होईल नारायण राणेंची ग्वाही

राजापूर (प्रतिनिधी़):आपण राज्याचा महसुलमंत्री असताना राजापूरात येणाऱ्या पुरापासून नागरिक व व्यापाऱ्यांची सुटका व्हावी म्हणून गाळ उपसा करण्यासाठी निधी दिला होता. त्यामुळे राजापूरातील पूर, पुररेषा आणि इथले नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या याबाबत आपल्याला पुर्ण माहिती आहे. आता राजापूर वासियांची या पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका व्हावी यासाठी आपण जातीनिशी लक्ष घालू. यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी उच्चस्तर अधिकाऱ्यांची बैठक घेवू व सकारात्मक मार्ग काढू अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. तर वाहतुकीस धोकादायक बनलेला कै. वासुकाका जोशी पुल येणाऱ्या वर्षात नव्याने उभा राहिलेला दिसेल असेही खा. राणे यांनी यावेळी सांगितले.

राजापूरात रविवारी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार ना. राणे मंगळवारी राजापूरात आले होते. यावेळी त्यांनी राजापूर शहरात जवाहर चौकात व बाजारपेठेबरोबर अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व अधिकारी व नागरिक व व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर उपस्थित होते. 

यावेळी काँग्रेसच्या माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, प्रांताधिकारी व प्रशासक वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले व्यापारी प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, विवेक गादीकर, अनंत रानडे व व्यापारी आणि नागरिक यांनी शहरात आलेला पुर व निर्माण झालेली परिस्थिती याबाबत माहिती दिली.

यावेळी या दोन्ही नद्यांतील गाळ काढणे आवश्यक असून शहरात नव्याने लादण्यात आलेल्या पुररेषेबाबतही फेरसर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले.

यावेळी खा. राणे यांनी पुर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्याची ग्वाही दिली. तर पुररेषेबाबतही नक्कीच विचार केला जाईल व राजापूर करांची पुर आणि पुररेषा यातुन कशी सुटका करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यासाठी शहराच्या एकूणच माहितीचा आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

यानंतर राणे यांनी  कै. वासुकाका जोशी पुलाची पहाणी केली. हा पुल धोकादायक झाला असून तो नव्याने बांधणे आवश्यक असल्याचे यावेळी आंबेवाडीतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सांगितले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी याबाबतचे निवेदनही खा. राणे यांना दिले.

यावेळी खा. राणे यांनी कै. वासुकाका जोशी पुल नव्याने आपल्या मागणी प्रमाणे वर्षभरात पुर्ण केला जाईल अशी ग्वाही दिली.

खा. नारायण राणेंच्या पहाणी दौऱ्याने नागरिक भारावले

राजापुरात दरवर्षीच पुर येतो, तो राजापूरकरांच्या पाचवीलाच पुजलेला अशी परिस्थिती आहे. मात्र लोकप्रतिनिधी याकडे कधीच गांभीर्याने पहात नाहीत, मात्र राजापुरात रविवार व सोमवार पुरपरिस्थिती होती आणि हे कळताच आपल्या हक्काचा खासदार तातडीने पुरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी आल्याचे पाहून नागरिक व व्यापारी भारावून गेले. अनेकांनी वैयक्तीक भेटून खा. राणेंकडे आपली कैफियत मांडली. खा. राणेंनी देखील प्रत्येकाचे ऐकून घेत मार्ग काढण्याची ग्वाही दिली. अनेकांनी राणेंच्या या दौऱ्यानंतर यालाच म्हणतात आपला हक्काचा माणूस अशा प्रतिक्रिया व्यक्त केली.