आता आपले दिवस आले आहेत, कोणाचीच भीती बाळगू नका : निलेश राणे

राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदर्श मतदार संघ करूया; सत्कार सोहळ्यात दिली ग्वाही

रत्नागिरी । प्रतिनिधी

गेली दहा वर्षे इथला विकास रखडला होता, मात्र आता राणे साहेबांसारखा नेता दिल्लीत गेलेला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली हा मतदार संघ आदर्श मतदारसंघ करण्यासाठी येत्या पाच वर्षात काम करूया, आता आपले दिवस आले आहेत त्यामुळे कोणी भीती बाळगू नका, राणे साहेब आपल्यासोबत आहेत अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थितांना दिली.

रत्नगिरी सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. निलेश राणे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोष करत रविवारी केलेले आंदोलन आणि त्याआधीपासून रत्नागिरीला दिलेले योगदान याबद्दल प्रतिसाद दिला. तर त्यांच्या भाषणाआधी ज्यांनी मनोगते व्यक्त केली त्यांनीही निलेश राणे यांच्या भक्कम नेतृत्वाचे कौतुक आणि इथली त्यांची गरज यावर भाष्य केले.

यावर बोलताना निलेश राणे म्हणले, चार जूनला निवडणुकीचा निकाल लागला आणि मला मीच खासदार झाल्यासारखं वाटू लागल आहे. दहा वर्षांची आपली प्रतीक्षा संपली आहे. या दहा वर्षात आधीच्या खासदारांने इथं काहीच केलं नव्हतं. गेल्या दहा वर्षातला माझा संघर्ष एका व्यक्तीविरुद्ध नव्हता तर कोकणच्या विकासासाठी होता. माझ्या खासदारकीच्या काळात मी एक व्हिजन ठेऊन काम केले होते. रेल्वेचा डबल ट्रॅक, महामार्ग चौपदरीकरण, इको सेन्सिटिव्ह असे प्रश्न मी संसदेत मांडले. मोठा विरोध निर्माण करण्यात आला होता तरीही इथे रोजगार निर्माण व्हावा यासाठी अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यातून झालेला पराभव स्वीकारला पण माझ्या मतावर ठाम राहिलो.  कोकणात अनेक प्रकल्प येण्याच्या तयारीत होते, त्यातून रोजगार निर्माण होणार होते पण षडयंत्र रचून त्याला विरोध केला गेला.  ज्यांनी नाणार रिफायनरी विरोध केला त्यांनी नवा पक्ष काढला, तीन महिन्यात इथल्या तरुणांना रोजगार देणार अशी घोषणा केली होती. पण नाणार येथील रिफायनरी रद्द झाली आणि रोजगार देणारेही निघून गेले, त्यांनी आत्तापर्यन्त किती रोजगार इथल्या तरुणांना दिले असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला.

2014 नंतर मी पुन्हा राजकारणात येणार नाही असं  अनेकांना वाटत असताना या रत्नागिरी जिल्ह्याने मला परत बोलावलं. या जिल्ह्यानेच माझ्यावर भरपूर प्रेम केलं,  त्यामुळेच या जिल्ह्याचे उपकार कधीच विसरणार नाही. त्यामुळे इथल्या विकासासाठी, प्रश्नासाठी जर याही पुढे आंदोलन झाले तर  निलेश राणेच तुम्हाला पुढे दिसेल असा विश्वास निलेश राणे यांनी उपस्थितांना दिला. ते म्हणाले, रत्नागिरीतील रविवारच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राला समजलं की रत्नागिरीला हिंदू समाज किती ताकदीचा आहे. या आंदोलनानंतर 450 जणांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यात पहिलं नाव माझं आहे. पण तरीही गोमातेच्या रक्षणासाठी मी सातत्याने येणार, हा मतदारसंघ आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, आता भीती बाळगू नका, तुमच्या विरुद्ध जर कोणाचाही फोन आला तर दुसरा फोन आमचा असेल हे विसरू नका. आता आपले दिवस सुरू झाले आहेत. आता राणे साहेब आपल्या सोबत आहेत असे म्हणत निलेश राणे म्हणाले, साहेब तुम्ही दिल्ली सांभाळा आम्ही स्थानिक पातळीवर काम करतो, तुमच्या मार्गदर्शनाखाली हा मतदार संघ आदर्श मतदारसंघ कसा असतो ते पाच वर्षात आम्ही दाखवणार अस काम करू अशी ग्वाही यावेळी निलेश राणे यांनी दिली.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा इंजिन असलेली बीएमडब्ल्यू !

आपल्या भाषणात निलेश राणे म्हणाले, सध्याचा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा बीएमडब्ल्यू गाडीसारखा सारखा आहे. म्हणजे गाडी बाहेरून चकाचक दिसते पण आतलं इंजिन बिघडलेले आहे अशी त्याची अवस्था आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.