खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील शिवतर येथील ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल येथे राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. याचवेळी वृक्षदिंडीही काढण्यात आली.
शाळा समितीचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव मोरे यांच्याहस्ते वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षपालखी खाद्यांवर घेत ढोल-ताशांच्या गजरात दिंडी काढली. संवर्धन करण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. वृक्षांचे संस्थेचे मुख्य कार्यकारिणी अधिकारी श्रीराम पालांडे, वनरक्षक अशोक ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवतर गावदेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंतराव मोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक ऋषिकेश शिंदे, जयश्री फुंदे, मुख्याध्यापक आशफाक काझी, हरित सेना विभागप्रमुख लक्ष्मण बाईत आदी उपस्थित होते.











