
बांधावरची शाळा भरवत शेती कामांचा मुलांनी लुटला आनंद
सावंतवाडी । प्रतिनिधी : शाळेतील अभ्यास खेळ व आजच्या डिजिटल युगात मोबाईल व कम्प्युटरवर रमणाऱ्या चिमुकल्या हातांमध्ये भाताची रोपं आल्यावर शेतीतील तो मुलांचा आनंद अवर्णनीय दिसत होता. ऐरवी मैदानात खेळणारी ही मुलं चिखल माती तुडवीत प्रत्यक्ष चिखलात उतरून शेतीचा आनंद घेताना चिखलातून उगवलेल्या कमळांप्रमाणेच भासत होती. निमित्त होते ते “बळीराजासाठी एक दिवस ” उपक्रमाचे …
“बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत मळगाव येथीलच शेतकरी प्रभाकर खडपकर यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी व भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल यांच्या मनात आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने “बळीराजासाठी एक दिवस” हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जातो. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता या शाळेतील , शिक्षकांनी मुलांसोबत शेतीत जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरविली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सह शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, श्रावणी सावंत, शेतकरी प्रभाकर खडपकर, एकनाथ खडपकर व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रभाकर खडपकर यांनी मुलांना शेतीविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मुलांना आधुनिक शेती अवजारांची प्रात्यक्षिक
दाखवत ती कशी चालवावीत याविषयी माहिती दिली. यावेळी विवेक नार्वेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जिल्हा परिषद राबवत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शाळेतील शिक्षक व मुलांनी प्रत्यक्ष शेतीमध्ये उतरत नांगरणी, तरवा काढणी, भात लावणी आदी कामांचा मनमुराद आनंद लुटत एक दिवस बळीराजासाठी उपक्रम साजरा केला. यावेळी प्रभाकर खडपकर यांनी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला शाळेच्या मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोप काढण्यासाठी मातीत घातलेले हात मातीशी असलेले नातेच जणू दृढ करत होते. या उपक्रमामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवाचा व काम करण्याचा आनंद तर मिळालाच; पण शेतकऱ्यांबद्दल आदर व ऋण व्यक्त करण्याची एक संधीही मिळाली, असे सांगत मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी हा उपक्रम राबविताना सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
तर आम्ही मुलांनी आज तरवा काढणी व भात लावणीचा आनंद घेतला. अन्नधान्य तयार करण्यासाठी शेतकरी किती मेहनत करतो हे पाहिले व अनुभवले. आम्हाला लागेल तेवढेच अन्न घेणार, अन्न वाया घालवणार नाही. मोठे होऊन शेती करणार तसेच कृषी क्षेत्रात काम करणार अशी भूमिका यावेळी काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.











