भर दिवसा रत्नागिरी शहरात चोरी

 

पऱ्याची आळी येथील सदनिका फोडून ९४ हजाराचे दागिने, रक्कमेची चोरी

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील पर्‍याची आळी येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना रविवार 14 जुलै रोजी दुपारी 12.45 ते सायंकाळी 6 वा. कालावधीत घडली आहे.

 

याबाबत फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार 14 जुलै रोजी ते कुटुंबासह त्यांच्या सासरी लांजा शिपोशी येथे गेलेल होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने पर्‍याची आळी येथील दिगंबरदास प्लाझामधील फिर्यादीच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी व कुलुप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी गोदरेज कपाटाच्या दरवाजाचा लॉकर उचकटून सोन्याचे 50 ग्रॅम वजनाचे 69 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख 25 हजार रुपये असा एकूण 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लांवबला.

 

रविवारी सायंकाळी फिर्यादी घरी आल्यावर त्यांना सदनिकेच्या दरवाजाची कडी व कुलुप उचकटलेले दिसून आले. त्यांनी आतमध्ये जाउन पाहिल्यावर त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्ररकणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331 (3),305 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.