फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाला “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२४” क्रमवारीत स्थान

 

रत्नागिरी : आऊटलूक साप्ताहिक आणि आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२४” च्या सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने भारतातील १६० उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ६० वे स्थान, महाराष्ट्रामधील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ९ वे स्थान पटकावले आहे. तसेच “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२४” च्या सर्वेक्षणात भारतातील १६० उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत स्थान मिळवणारे हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठ व कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

 

मुंबई विद्यापीठ व कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रामधील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ९ वे स्थानभारतातील १६० उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ६० वे स्थान सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेमार्फत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध गुणात्मक बाबी जसे शिक्षक, शिक्षण व संशोधन दर्जा, उद्योग जगताशी असलेला सहयोग व प्लेसमेंट, पायाभूत सुविधा, प्रवेश प्रक्रिया व महाविद्यालयाचे प्रशासन, महाविद्यालयातील विविधता व  व्याप्ती आदींच्या आधारावर दर्जा ठरवून उत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली. फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष कै. श्री. पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे महाविद्यालय कोकणामध्ये दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखले जाते. कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासाचे योग्य प्रशिक्षण प्रदान करून, नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ॲकॅडमीचा नेहमी कल राहिला आहे.

 

या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन केले.