स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प राबविणार नाही : दीपक केसरकर

 

आजगांव मायनिंग प्रकल्पाबाबत विनायक राऊत करताहेत दिशाभूल

शाळेंच्या वेळेतील बदलाबाबत सूट देण्याचे अधिकार स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजगावमध्ये आमची वडिलोपार्जित जमीन आहे. मात्र, आमच्याच नाही तर इतर कुठल्याही जमिनीमध्ये मायनिंग प्रकल्प मंजूर नाही. त्यामुळे मी मायनिंगला जमिन दिली असे विनायक राऊत म्हणत असतील तर त्यांनी आत्मक्लेष करून घ्यावा असा टोला लगावतानाच ज्या गोष्टीला ग्रामस्थांचा विरोध असेल त्याला माझाही विरोध कायम राहील. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प राबविणार नाही याबाबत कोणीही शंका बाळगू नये, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, आंदोलन करून राजकीय पोळी भाजायची ही विनायक राऊत यांची जुनीच पद्धत आहे. मी लवकरच आजगावसह परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा करून स्थानिक आमदार या नात्याने त्यांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचेही मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील श्रीधर आपारमेंट या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मायनिंग प्रकल्पावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले.
ते म्हणाले, स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही. ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला नसताना त्या ठिकाणी ड्रोन सर्वेचा घाट घातला जातो याबाबत आपण संबंधित स्थानिकांची लवकरच भेट घेणार आहे. नेमकी वस्तुस्थिती जाणून घेऊन त्यांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.
सदयस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून तिलारीच्या धरणाचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्या ज्या ठिकाणी नुकसानी झाली त्याचे पंचनामे सुरू आहेत. लवकरच नुकसानीची मदत देण्यात येणार आहे. शिवाय पूर्वीची बाकीही शासन स्तरावर जमा असून त्याचेही वाटप केले जाईल.

 

दुसरीकडे कौले फुटून शाळेमध्ये गळती होत असल्यास ओल्या झालेल्या भिंतीच्या बाजूला विद्यार्थ्यांना बसू नये याची काळजी शिक्षकांनी घ्यावी. लवकरच शाळा दुरुस्तीसाठी योजना अमलात आणण्यात येणार आहे. शाळेंच्या वेळेस झालेल्या बदलाबाबत कोणाची अडचण असेल तर त्यात सूट देण्याचे अधिकार स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुलांची डेव्हलप होण्यासाठी पूर्ण झोप असणे गरजेचे आहे. यासाठी हा निर्णय आहे लवकरच मुलांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवण्याकरता महा वाचन उत्सव महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे.

शिरोडा येथील पंचतारांकित हॉटेलचे लवकरच भूमीपूजन

लोकांना भडकविणारे विनायक राऊत लोकसभा निवडणुकीत कशामुळे पडले याचा विचार करावा ते कधीच जनतेला सकारात्मक विचार देऊ शकले नाही गेले २५ वर्ष रखडलेला शिरोडा येथील ताज प्रश्न मी सोडवला. लोकांच्या मागणीप्रमाणे अतिरिक्त पैसे देण्याची व्यवस्था केली आता नकाशे फायनल होऊन पहिल्या भरात परवाना मिळणार आहे त्यानंतर लगेचच पहिला हप्ता लोकांना दिला जाईल आणि त्याच दिवशी हॉटेलचे भूमिपूजनही होईल.