हरी शयनाचा आरंभ, चातुर्मासाचा प्रारंभ!

सौ. स्वाती चंद्रशेखर तेली. जामसंडे.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी!

यावर्षी आज १७ जुलैला “आषाढी एकादशी” आहे.या एकादशी विषयी एक कथा सांगितली जाते ती अशी की,पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले होते आणि या युद्धात कुंभ नावाच्या राक्षसाचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान शंकरांकडून अमरपद प्राप्त करून घेतले होते. साहजिकच त्याच्या भयाने सर्व देव लपून बसले होते.त्यामुळे त्यांना दिवसभर उपवास घडला आणि मुसळधार पाऊस लागत असल्याने देवांना स्नानही घडले.याचा परिणाम म्हणून देवांच्या श्वासातून अचानक एक शक्ती बाहेर पडली आणि त्या शक्तीने मृदुमान्य यास ठार केले.आणि ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एकादशी होती. शास्त्र वेदानुसार जे लोक या दिवशी भगवान विष्णूसह एकादशीची उपासना करतील त्यांची कळत नकळत झालेली पापे सुद्धा धुवून निघतील असा विश्वास बाळगला जातो.
आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी ‘असेही म्हणतात.आता देव शयनी म्हणजे काय? तर देव या दिवशी योगनिद्रेत जातात ते “देव उठणी “एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीला उठतात. याच कालखंडास “चातुर्मास” म्हणतात.या काळात कोणतीही शुभ कार्ये होत नाहीत. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांची एक ‘अहोरात्र’ असते.दक्षिणायन ही देवांची रात्र तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. पद्मपुराण तसेच भागवत पुराणात हरीशयना ला ‘ योगनिद्रा ‘असे म्हणतात.
तात्पर्य असे की या चार महिन्यात काळे गडद ढग आणि वर्षा म्हणजे पाऊस या कारणाने वातावरण गढूळ कुंद आणि अभ्राच्छादित असते. म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचे तेज क्षीण होते. हे त्याचे हे त्याचे द्योतक आहे.मनुष्याची देखील चयापचय तसेच शारीरिक क्षमता देखील क्षीण होते. आधुनिक विज्ञानानुसार या काळात सूक्ष्मजीव जंतूंची उत्पत्ती आणि वाढ होत असते.आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर!
भगवान श्रीकृष्ण विठुरायाचे रूप घेऊन पंढरपुरात विराजमान आहे. वैकुंठ भूमीच्या आधी पंढरपूर अस्तित्वात आहे म्हणूनच या संदर्भात संत नामदेव महाराजांनी सांगितले ते असे, ‘जेव्हा नव्हते चराचर |तेव्हा होते पंढरपूर || तसेच “आधी रचली पंढरी नंतर वैकुंठ नगरी “अशी ओवी देखील आहे. म्हणून असे म्हणतात की पृथ्वीवर दोनच तीर्थक्षेत्रे अशी आहेत,की ती कधीच लोप पावणार नाहीत. ती म्हणजे पंढरपूर आणि काशी. कारण या क्षेत्राचा अविनाशी महिमा भगवान शंकर आणि विष्णूंनी आपल्या अखंड वास्तव्याने दाखवून दिला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूर मध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. अठ्ठावीस युगे विटेवर उभा असणारा विठोबा भक्तांच्या भक्तीसाठी भुकेला आहे.याच्या एका दर्शनासाठी,त्याला डोळे भरून पाहण्यासाठी वर्षानुवर्षे मैलोनमैल पायी वारी करणारे वारकरी बघितले की मन गहिवरून आल्यावाचून राहत नाही.
इसवी सन १२९१ मध्ये पहिली दिंडी आळंदीहून पंढरपूरला निघाली.हातात तुळशीच्या माळा, कपाळावर गंध टिळा,मुखाने हरिनामाचा गजर, गळ्यात विणा,मृदंग टाळ तसेच महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणे एक अनुपम्य सोहळा असतो. नित्यनियम म्हणजे वारी. जो नित्यनेमाने वारीला जातो त्याला “वारकरी “म्हणतात.
‘ पंढरीचा वास चंद्रभागे स्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ ही एकच इच्छा वारकऱ्यांची असते.
जागतिक स्तरावर शतकानुशतके वारीचा अभ्यास सुरू आहे.पृथ्वीवर तीर्थे असती अपार,परी पंढरीची सर एकाही नाही. असा दाखला संत नामदेव महाराज देतात.
श्री विष्णू अर्थातच पांडुरंगाचे भक्त एकादशीला उपवास करतात.आदल्या दिवशी एकभुक्त राहून एकादशी दिवशी प्रातःस्नान आटोपून पांडुरंगाला तुळशी अर्पण करून पूजा करतात. तसेच संपूर्ण दिवस उपवास करतात.रात्री हरीभजन करीत, जागरण करतात आणि आषाढ शुद्ध द्वादशीला पारणे सोडतात.पांडुरंगाला अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो.
व्यक्तिगत जीवनातील विकार बाजूला ठेवून देहभान विसरून ईश्वराच्या नामस्मरणात दंग व्हायला लावणारा सोहळा म्हणजे वारी!
आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूर येथे भक्तांचा होणारा महासंगम पाहायला मिळतो. पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य मिळत नाही, तेवढे एका पंढरपूरच्या वारीने मिळते.