कृणाल ठाकूर पेडणे तालुक्यातील पहिला दिव्यांग बीए एलएलबी उत्तीर्ण विद्यार्थी

 

नवचेतना युवक संघ पेडणेतर्फे सत्कार

पेडणे | निवृत्ती शिरोडकर : अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे. त्या मुलांमधील विशेषत्वाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले एक लक्षण असते. म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने चित्रे काढतो तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो. अर्थात यातून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात केलेली दिसते. कृणाल ठाकूर यांनीही आपल्या अपंगत्वावर मात करत बी.ए, एलएलबी ही पदवी संपादन करून अभिमानास्पद कार्य केलेले आहे. आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपल्याला ध्येयाकडे पोहोचण्यास कोणीही अडवू शकत नाही हे कृणालने आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे प्रतिपादन चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस यांनी केले.

नवचेतना युवक संघ पेडणे तर्फे पेडणे तालुक्यातील पहिला बी.ए एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण करून कायद्याची पदवी संपादन केलेल्या हरमल येथील कृणाल किरण ठाकूर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, वडिल किरण ठाकूर, आई करिश्मा ठाकूर उपस्थित होते.

नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर म्हणाले, माणसाकडे जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर जीवनात अशक्य असे काहीच नाही. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागते. यानंतर यश खेचून आणता येते. कृणाल ठाकूर यांनी असेच अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. अपंगत्वावर मात करत परिस्थितीला दोषी न ठरवता स्वतः परिस्थिती बदलवून संपादन केलेले हे यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.अपंगत्व येताच अनेकजण हतबल होऊन एकतर जगायची आशा सोडून देतात किंवा रडत-कुढत तरी आयुष्य जगतात. पण कृणाल ठाकूर हे व्यक्तिमत्व याला अपवाद ठरले आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना कृणाल ठाकूर म्हणाला, तुमचे ध्येय निश्चित असेल आणि त्यादृष्टीने तुम्ही सातत्य राखत मेहनत करत असाल तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक,शारीरिक अडचणींवर तुम्ही सहज मात कराल. कठोर परिश्रमाला मात्र पर्याय नाही. मेहनतीची जोड असेल तर ध्येय कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. आपल्याला प्राथमिक स्तरावर शिक्षक श्री. दाभोळकर, माध्यमिक स्तरावर ज्योती वळवईकर व धनश्री सुभाजी, उच्च माध्यमिक स्तरावर प्रा. राज देसाई तसेच हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी आई-वडिलांनी जी मेहनत घेतली. वडिलांनी आपल्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मला पणजी येथे कॉलेजमध्ये ने आण करायचे काम केले.

पेडणे तालुक्यात ४५० दिव्यांग व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींच्या ज्या काही समस्या सरकार दरबारी किंवा अन्य ठिकाणी असतील त्यासाठी आपण नेहमीच त्यांना सहकार्य करणार. सरकारी कार्यालयातील अर्ज करणे, योजना संदर्भात पत्रव्यवहार यासारखी कामे करून माझ्या कायद्याच्या पदवीचा मी पूर्ण वापर समाजाच्या सर्व घटकांना करणार असल्याचे मत कृणाल ठाकूर यांनी व्यक्त केले.