चैतन्य आर्टस् संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान
चिपळूण (प्रतिनिधी):— चैतन्य आर्टस् चिपळूण संस्था आयोजित आषाढी एकादशीच्या दिवशी ‘आषाढवारी’ कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले. हा कार्यक्रम येथील गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदारशेखर निकम, कोकणगंधर्व राजाभाऊ शेम्बेकर, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, दशरथ दाभोळकर व सौ. दिशा दाभोळकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन व रंगमंचाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘देवाचिया द्वारी’ या विजयकुमार जोशी यांच्या अभंगाने सुरुवात झाली आणि वातावरण पूर्णतः भारून गेले. त्यानंतर ‘कृपाळू दयाळू माझा ज्ञानेश्वर’ हा कु. जान्हवी खडपकर हिने अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. रविकुमार निगुडकर यांनी ‘ज्ञानियाचा राजा’ हा अभंग आपल्या वेगळ्या शैलीत सादर केला. कु. तन्वी हिने ‘विठ्ठल नामाची शाळा भरली व खेळ मांडीयेला’ हे गीते सादर केली. जान्हवी खडपकर हिने ‘वाचे विठ्ठल गाईन, देवा धरिले चरण, पतित तू पावना असे बहारदार’ अभंग सादर केले. ‘विठू माऊली तू’ अभंग विजय जोशी व निगुडकर यांनी उत्तम प्रकारे सादर करून रसिकांकडून दाद मिळवली. ‘विठ्ठल आवडी, कानडा राजा पंढरीचा, लई नाही लई नाही मागणे ही भैरवी सादरीकरण करण्यात आले. विठ्ठल नामाचा गजर होत होता आणि वातावरण विठ्ठलमय होऊन गेले होते. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
कार्यक्रमासाठी तबला साथ दिलीप संकपाळ, मयुरेश भागवत , पखवाज कु. संकेत नवरत, हार्मोनियम साथ कु. मानस साखरपेकर व रविकुमार निगुडकर, कीबोर्ड/ऑर्गन ची साथ सुरेश काजारी, तालवाद्य व टाळ मास्टर चैतन्य जोगले यांनी केली.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आपल्या भारदस्त आवाजात शाहीर प्रदीप मोहिते सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चैतन्य आर्टस संस्थेतर्फे चिपळूणमध्ये संगीत व सामाजिक क्षेत्रात संस्मरणीय कार्य करणाऱ्या सुरेश काजारी यांना कीबोर्ड/ऑर्गन वादनासाठी, शंकर उर्फ दादा बैकर यांना सामाजिक कार्यासाठी, विजयकुमार जोशी यांना हार्मोनियम वादन व गायन, शाहीर सुरेशदादा बहुतले यांना कलगी तुरा शाहिरी परंपरा योग्य रीतीने जतन केल्याबद्दल, संतोष खलाटे यांना रंगदेवतेची मनोभावे सेवा केल्याबद्दल या सर्वांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उद्योजक प्रशांत यादव, राजाभाऊ शेम्बेकर, सहदेव बेटकर आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे मनोगत झाल्यानंतर संस्थेचे सेक्रेटरी श्री. अरविंद जोगले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीपजी संकपाळ, सेक्रेटरी अरविंद जोगले, खजिनदार सौ. समिधा जोगले, सदस्य अनंत भैरवकर, संकेत नवरत, अनिकेत जोगले, चैतन्य जोगले, श्रावणी संकपाळ, भास्कर भुवड, मिलिंद जोगले यांनी मेहनत घेतली.












