Zilla Bank made a net profit of 21 crores during the financial year
रत्नागिरी । प्रतिनिधी : नुकत्याच संपलेल्या सन 2022-23 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 47 कोटी 33 लाख रुपयांचा ढोबळ नफा तर 20 कोटी 93 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक अजय चव्हाण हे मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी डॉ. चोरगे यांनी बँकेच्या आर्थिक वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, सलग दोन वर्षे सुरु असलेली मान्यताप्राप्त युनियनसोबतची वेतन कराराबाबतची चर्चा यशस्वी झाल्यानंतर वेतन करार करण्यात आला. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या वाढीव पगारावर सुमारे 3 कोटी रुपये खर्च झाले. अन्यथा आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचा निव्वळ नफा जिल्हा बँकेला मिळाला असता असे ते म्हणाले.
तरीही या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय 4072 कोटी 34 लाख 37 हजार रुपयांचा झाला असून 1662 कोटी 26 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. 2410 कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकेत जमा झाल्या आहेत. 1153 कोटी 83 लाख 26 हजार रुपयांच्या गुंतवणुका करण्यात आल्या आहेत. 5717 कोटी 28 लाख रुपयांचे जिल्हा बँकेचे भागभांडवल आहे. गंगाजळी, इतर निधी 21889.44 लाख रुपयांच्या आहेत. जिल्हा बँकेचा स्वनिधी 27606.72 लाख रुपयांचा झाला आहे. खेळते भांडवल 307111.39 लाख रुपयांचे झाले आहे. यंदा प्रथमच कर्जवसुलीसाठी सिस्टीम जनरेटेडवर भर देण्यात आला. जानेवारी अखेर 225 कोटी रुपयांची कर्ज येणे होती. मार्चअखेरपर्यंत फक्त 35 कोटी रुपयांची कर्ज येणे शिल्लक आहेत. यापूर्वी मॅन्युअलनुसार कर्जवसुली केली जात होती. गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी सिस्टीम जनरेटेड पद्धतीने कर्जवसुली केल्याबद्दल डॉ.तानाजीराव चोरगे यांनी समाधान व्यक्त केले.
ठेवीदारांचे हित सांभाळणारे आम्ही विश्वस्त म्हणून काम करीत आहोत. गेल्या 16 वर्षांपासून जिल्हा बँकेने महाराष्ट्रातील आपला दुसरा क्रमांक यंदाही कायम ठेवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने समाधानकारक प्रगती केली आहे. नाबार्ड, आरबीआय यांचे निकष पाळून जिल्हा बँकेचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेने तीन एटीएम व्हॅन खरेदी केल्या आहेत. प्रत्येकी तीन तालुक्यात एक याप्रमाणे एटीएम मोबाईल व्हॅन पाठवली जात आहे. असंख्य ग्राहकांना या व्हॅनचा फायदा होत आहे. सलग दहाव्या वर्षी जिल्हा बँकेचा नक्त एपीए शुन्य टक्के असून अ ऑडीटवर्ग अद्यापही कायम असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. ठेवींशी कर्जाचे प्रमाण नियमानुसार आहे. नेटवर्कमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. जिल्हा बँकेमार्फत सध्यातरी कोणत्याही नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या भर देण्यात येणार असल्याचे डॉ.तानाजीराव चोरगे यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या नवीन शाखा उघडण्याबाबत अद्यापही संचालक मंडळासमोर कोणताही प्रस्ताव आलेला नाही. गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत आर्थिक अनियमितता झालेली नसल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.