पावसाने उसंत घेतल्याने काजळी नदीचा पूर ओसरला

 

 

दोन दिवसात काही ठिकाणी पडझड व नुकसान 

लांजा (प्रतिनिधी ) सोमवारी दिवस भरात पावसाने उसंती घेतल्याने काजळी नदीचा पूर पूर्णपणे ओसरला आहे. मात्र पावसाने तालुक्यात गोठे, घरावर वृक्ष पडल्यामुळे नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसाचा फटका महावितरणला देखील बसला असुन चार ठिकाणी सहा पोल पडले आहेत. मात्र कुठेही जीवीत हानी झालेली नाही.

गेले दोन दिवस धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाने काजळी नदीला मोठा पूर आला होता. आंजणारी मठ येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले होतं. मात्र आज सोमवारी पाऊस कमी असल्यामुळे

काजळी नदीचा पूर पूर्णपणे ओसरला आहे. पावसामुळे तालुक्यातील निवसर येथे विजेचे तीन पोल, पन्हळे गावी एक, केळंबे गावी दोन, तर खेरवसेत एक पोल पडला आहेत.

त्याच प्रमाणे संजय आत्माराम पत्याणे रा.वाघ्रट यांच्या मालकीच्या गोठ्याची इमारत कोसळून 12000 रू नुकसान झाले. राजाराम कदम इसवली यांचा गोठा पूर्णत: कोसळून 11000 रू नुकसान, दीपक पांडुरंग रेवाळे (राहणार भडे ) यांच्या घरातील पडवीचे तर केळंबे येथील प्रतिक्षा प्रकाश केळंबेकर याच्या घराच्या पडवीवर झाड पडल्यामुळे पत्रे फुटून नुकसान झाले.तालुक्यातील उपळे येथील यशवंत भानू कुर्तडकर याच्याही घराचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले असुन शेतक-याच्या शेतीचेही नुकसान झाले आहे.

याबाबत महसूल विभागा कडून पंचनामे सुरु आहेत.