मंडणगड | प्रतिनिधी : सत्ताधारी व विरोधकांचे श्रेयवादाच्या संघर्षात शहरीकरणाच्या प्रदुषणाच्या समस्येने ग्रासलेल्या मंडणगडच्या विकासाचे प्रश्न मागे पडलेले आहेत याची प्रचिती नगरपंचायतीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेतही आली आहे. नगरपंचायतीच्या सत्ताकरणाच्या दुसऱ्या पर्वातील दीड वर्षात शहरातील पथदिव्यांचा प्रश्न संपलेला नाही. या प्रश्नावर वेळोवेळी होणाऱ्या सभेत चर्चा होते समस्या सोडवण्यासाठी उपाय योजनांचे नियोजनही केले जाते मात्र त्यावर सर्वसमावेशक तोडगा निघत नसल्याने पाणी या जीवनावश्यक प्रश्नानंतर पथदिव्यांचा प्रश्न सर्वाधीक चर्चेचा विषय ठरतो.साध्या विषयात संर्घष करण्यापेक्षा सत्ताधारी व विरोधकांनी संगनमताने हा प्रश्न सोडवणे अद्याप शक्य का झालेला नाही असा प्रश्न येथील मतदारांना नक्कीच पडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरात विविध समस्यांचे निराकरण सर्वसाधारण सभेनंतर होणे आवश्यक होते. शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे, सांडपाण्यानी भरलेली गटारे व जागोजागी साठलेला कचरा याकडे लक्ष देण्यास कोणालच वेळ नाही. लोकप्रतिनिधींची सर्व ताकद तुलनेने कमी महत्वाच्या प्रश्नावरच खर्च होत असल्याने ग्रामिण व शहर अशा संक्रमाणाच्या अवस्थेत सापडलेल्या निम शहरी मंडणगडच्या पायाभुत म्हणाव्यात अशा समस्या नगरपंचायतीचे स्थापनेच्या साडेसहा वर्षानंतरही सुटलेल्या नाहीत. शहर विकास आराखाड्याची चर्चा गेल्या सात वर्षापासून सुरु आहे.
या विकास योजनेचे स्वरूप प्राथमिक स्वरुपातच आहे. नुकतेच प्रस्थावित जमीन नकाशा संदर्भात सभा झाली, हि काय ती जमेची बाजू म्हणता येईल. या संदर्भात केवळ कल्पना विलासात रमण्यापेक्षा येथील लोकप्रतिनिधींनी शहराविकासाकरिता एकत्रित काम पाहण्याची आवश्यकता आहे. नगरपंचायत म्हणून ज्या पायाभुत सुविधा या संस्थेने उभ्या करणे आवश्यक आहे त्या सुविधाही अद्याप निर्माण झालेल्या नाहीत. नागरपंचायतीचेवतीने येथील नागरीकांना शहरात निर्माण होणारा कचरा विलगीकृत करुन नगरपंचायतीचे कचरा गाडीत टाकण्याची कायदेशीर सक्ती करण्यात आली आहे मात्र नागरीकांकडून गोळा केलेल्या कचऱ्याचे नगरपंचायतीचे कचरा डेपोत विलीगीकीरण करुन नंतर त्याची विल्हेवाट आजही लावली जात नाही. असे असतानाही सत्ताधारी व विरोधक आजही रस्ते व पाखाड्याच्या बांधकामातच अडकून पडलेले आहेत. नगरपंचायतीचे सत्ताकारणात समाजकारण त्यातून विकासकारण या पायाभुत तत्वाचा येथील सर्वच लोकप्रतिनिधीना विसर पडला आहे का असे नागरिक व्यक्त होऊ लागले आहेत. सद्यस्थितीत नगरपंचायतीमधील सत्ताधारी व विरोधक राज्यात एकत्र सत्तेत असल्याने मंडणगडचे विकास प्रश्न सुटण्याची माफक अपेक्षा फळास आलेली नाही.
सत्ताधारी व विरोधक दोन्हीही सत्तेत अशी स्थिती असल्याने या दोन्ही आघाड्यांवरील नगरसेवकांना आपल्या शहराचे रुपडे बदल्याची सुसंधी उपलब्ध झाली आहे, पण सद्यातरी अशी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. आपल्या नेतृत्वाने मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे शासकीय सोपस्कार नगरसेवकांना अजूनही पूर्ण करता आले नाहीत. तर सत्तासंघर्षाच्या पेचात स्थगिती मिळालेल्या कामांवरील स्थगिती अद्याप जैसे थे आहे.












