निळवणेत रस्ता खचून वाहतूक ठप्प

 

खेड (प्रतिनिधी) गेल्या २ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील निळवणे-कातळवाडी येथील रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. खचलेल्या रस्त्यामुळे एसटी बसेससह अन्य वाहने मार्गस्थ होत नसल्याने ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

खचलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी घरांच्या पडझडींसह रस्ते खचत आहेत. निळवणे- कातळवाडी येथेही रस्ता पूर्णतः खचला. ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी एकच मार्ग असल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. रस्त्याची लवकरच दुरूस्ती होणे अशक्यच -आहे. यामुळे ग्रामस्थांची एसटी बसेसअभावी हेळसांड होणार आहे. पायवाटेवरून पायपीट करत इच्छितस्थळ गाठावे लागणार आहे. तलाठ्यांमार्फत खचलेल्या रस्त्याचा पंचनामाही करण्यात आला आहे. तसा अहवाल तहसीलदार यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.