संतोष कोत्रे l लांजा:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या वनगुळे इंदवटी रस्त्यावर वनगुळेच्या पुढे डावरे या ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सध्या पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील या भेगा आणखी रुंदावल्या तर रस्ता बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनगुळे इंदवटी हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन ते तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता या रस्त्यावर लांजा आगारातून एसटीच्या आठ ते नऊ फेऱ्या सुरू आहेत. त्याचप्रमाणे वनगुळे इंदवटी या भागातून लांजा येथे सुमारे ७० ते ८० विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात . त्याचप्रमाणे दररोज लांजा येथे कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या देखील मोठी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर वनगुळेच्या पुढे डावरे येथे मोठ्या प्रमाणात रस्त्याला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत.
भविष्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यास या रस्त्यावरील भेगा रुंदावल्या जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची भिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्तावर पडलेल्या भेगा बुजवण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी प्रवासी वर्ग, विद्यार्थी यांच्यातून केली जात आहे.












