धोकादायक गांधी चौक पुलाकडे दुर्लक्ष केल्याने तीन गावांना वाहतुकीचा फटका.

पुलाची अप्रोच संरक्षण भिंत कोसळल्याचे आले समोर.

चौकशीची मागणी.

मंडणगड : प्रतिनिधी :  मंडणगड गांधी चौक पुल वाहतुकीस बंद झाल्यामुळे तीन गावातील हजारो नागरिकांचा तालुक्याशी संपर्क विस्कळीत झाला आहे. याचा सर्वाधिक फटका कोंझर, अडखळ, टाकवली या गावातील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत आहे. या पुलाची पाहणी केली असता, पुलाची अप्रोच संरक्षण भिंतच रविवारच्या (दी. 21 जुलै ) पावसात कोसळली असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर करून वाहतुकीसाठी बंद केला. सामान्यांसाठी असलेल्या एसटी च्या फेऱ्या सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत महसूल प्रशासनाने दाखवलेली कार्यतत्परता योग्यच आहे. मात्र प्रश्न निर्माण होतो तो पन्नास वर्षांपूर्वी निर्मिती केलेला पूल जीर्ण व नादुरुस्त होत चालला असतानाही लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवकांनी या पुलाबाबत अथवा पर्यायी नवीन पुलाच्या निर्मितीसाठी कोणतीही कार्यवाही का केली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाचा फटका आता उपरोक्त गावांतील नागरिक, विद्यार्थ्यांना बसला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

 

 

 

 

गांधी चौक पुलाचे याआधीच स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते. ते ऑडिट करणे एव्हाना नगरपंचायत प्रशासनाला का गरजेचे वाटले नाही हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. असे असले तरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व पूल जुना असल्यामुळे पर्यायी नवीन पुलाच्या मागणीचा प्रस्ताव सादर करून त्याबाबत पाठपुरावा करणे यांस अग्रक्रम देणे गरजेचे होते. नगरपंचायतीचे सत्ताधारी व विरोधकांचे वरिष्ठ नेतृत्व राज्यात मांडीला मांडी लावून बसले असल्याने या दोघांनाही या पुलाला पर्यायी नवीन पूल मंजूर करून त्यास निधीची तरतूद करणे तसे अशक्य नव्हते, असा साधा ठोकताळा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र ती तत्परता दाखवण्यात नगरसेवक पुढाऱ्यांना अपयश आले आहे. गांधी चौक पुलाची घटना घडून चार दिवस उलटून गेले तरी नगरसेवक वा नगरपंचायतीने या गंभीर विषयासंदर्भात साध्या बैठकीचे आयोजन केले नसल्याचे कळते. त्यामुळे शेकडो नागरिकांच्या वाहतुकीचा किंबहुना तालुक्याशी तुटलेल्या संपर्काबाबत संबंधितांना कोणतेही सोयर सुतक नसल्याचे समोर आले आहे.
मंडणगड ते टाकवली हे अंतर सुमारे 9 किमी. आहे.

 

 

 

 

या मार्गावरून 50 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी नियमित ये – जा करत असतात. कोंझर,अडखळ, टाकवली या गावातून नैमित्तिक कामाकरिता, औषधोपचार, बँकेचे व्यवहार तसेच शिक्षणाकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये – जा असते. या मार्गावर दिवसभरात एसटीच्या चार फेऱ्या नियमित सुरू असतात. आता त्या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी या मार्गावर प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार. पावसाचे दिवस असल्याकारणाने गावांमध्ये रुग्णसंकेत वाढ होत असते, अशा रुग्णांना उपचाराकरिता मंडणगड शहरात येण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. पर्यायी मार्ग गांधी चौक गावातून उपलब्ध असला तरी हा मार्ग अतिशय लहान असल्यामुळे केवळ छोट्या वाहनांची वाहतूक शक्य आहे. त्यामुळे या समस्सेसंदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून उपाययोजना अंमलात आणण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.