डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती व्याख्यानमालेत बोरगाव येथे केले प्रतिपादन
चिपळूण (प्रतिनिधी ): शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला समतोल घडवण्यासाठी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे, तरच आपल्याला यशस्वी होता येते, असे स्पष्ट प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस तथा मुक्तपत्रकार संदेश पवार यांनी येथे केले .
चिपळूण तालुक्यातील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हणे संचलित वसंत जयराम भागवत विद्यामंदिर व वसंतराव आणि शांताबाई पटवर्धन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव येथे डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते ” विद्यार्थी आणि व्यक्तिमत्व विकास ” या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य शंकर गलांडे हे होते. तर विचार मंचावर प्रमुख उपस्थिती पंचशील सेवा संस्थेचे अध्यक्ष बुद्धघोष गमरे तसेच ज्येष्ठ शिक्षक श्रीमंत शिरोळे , शिवाजी सरगर आदी उपस्थित होते.
पत्रकार संदेश पवार पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आजच्या वर्तमानातील समाज जीवनाचा अभ्यास करता वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करायला हवा. नवनव्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्यावर मात करायला हवी. आभासी दुनियेतून बाहेर पडून वास्तवात जगायला शिकायला हवे. मोबाईलच्या क्रांतीमुळे जग जवळ आले खरे, परंतु माणसा माणसातील संवाद आणि सहवास हरवत चालला आहे. नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी सैल होत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा, नवनव्या साधनाचा आवश्यक तेवढाच वापर करायला हवा. त्याच्या आहारी न जाता आपले काम करायला हवे.
विद्यार्थ्यांनी आपले करियर निवडताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छंद, आवड जोपासण्याची नितांत गरज आहे. स्वतःला अद्यावत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे वाचन करण्याची सवय लावली पाहिजे. थोरा-मोठ्यांचे विचार समजून घेण्यासाठी विविध अंगी वाचन करायला हवे . सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता समाजात वेगवेगळ्या प्रकारे मिसळायला हवे. सर्व थरातील मित्र मैत्रिणींच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायला हवे. तरच आपल्यातील संवेदनशीलता टिकून राहू शकते.
विद्यार्थ्यांनी आपली वैचारिक बैठक हळूहळू पक्की करण्यासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास करायला हवा. ज्या संविधानाची प्रस्ताविका आपण शाळा महाविद्यालयातून रोज म्हणतो, त्या संविधानातील तत्त्वांचा अंगीकार आणि त्या तत्त्वांना शिरोधार्य मानणारी वैचारिक बैठक तयार होणे गरजेचे आहे. म्हणजे एक आदर्श भारतीय समाज निर्माण होऊ शकेल, असे सांगून विविधअंगी उदाहरणांचा दाखला देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी स्फुल्लिंग चेतवले . तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची माहिती याप्रसंगी दिली. तसेच डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या कार्याचा थोडक्यात आढावाही त्यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या प्रतिमेस संदेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार व बुद्धघोष गमरे, मुख्याध्यापक शंकर गलांडे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच यावेळी संदेश पवार व बुद्धघोष गमरे यांचा मुख्याध्यापक शंकर गलांडे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास इयत्ता आठवी ते बारावीचे सुमारे 300 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षक वर्ग, विनोद शिंदे ,सचिन विचारे, सौ श्वेता पाटील , धनश्री पुनस्कर , अविनाश शिर्के, शंकर सागवेकर, सौ शिंदे आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ शिक्षक शिवाजी सरगर यांनी केले.











