राजापूर l प्रतिनिधी : या आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी गुरुवारी रात्री पडलेल्या पावसाने राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेडा पडला आहे . गुरुवारी मध्यरात्रीच अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली होती त्यामुळे शुक्रवारी पहाटे जवाहर चौक पाण्याखाली गेला आहे .
रविवारी पडळेल्या मुसळधार पावसाने शहरात पुराचे पाणी शिरले होते मात्र सोमवारपासुन पावसाने उसंत घेतली असली तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाउस सरींवर बरसत होता . गुरुवारीही दिवसभर पाउस सरींवर बरसत असल्याने सायंकाळी शहरातुन वाहणाऱ्या कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती . त्यामुळे पुराची शक्यता लक्षात घेवुन नागरिक व व्यापारीवर्गाने अगोदरच दक्षता घेतली होती .
मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी पहाटे पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने यायला सुरुवात झाली होती मात्र सकाळी संपुर्ण जवाहर चौक पाण्याखाली गेला आहे . राजापूर शहरातील चिंचबांध मार्गे शीळ गोठणेकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे . तर शहराच्या अन्य भागातही काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे . शुक्रवारी सकाळपासुन पावसाने पुर्णत: उघडीप घेत उन्ह पडले असले तरी पुराचे पाणी अद्यापही जवाहर चौकात ठाण मांडुन असल्याने एस्टी सेवा बंद ठेवण्यात आली असल्याने प्रवासांचे हाल झाले आहेत . तर शहरातील वाहतुक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झाले आहे .











