मसूरे | झुंजार पेडणेकर :गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वारे आणि जोरदार पाऊस यामुळे मसूरे मेढावाडी येथील अनिरुध्य यशवंत बागवे यांच्या राहत्या घरावर ‘ निमारा ‘ हा जंगली वृक्ष कोसळून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. अनिरुद्ध यांची पत्नी वैष्णवी या घरात काम करत असतानाच सदर घटना घडल्याने सुदैवाने त्या बचावल्या आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान सरपंच संदीप हडकर, मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, तलाठी वाय. बी. राजूरकर, पोलीस विवेक फरांदे यांनी तातडीने धाव घेत नुकसानग्रस्ताना धीर दिला. नुकसानीचा पंचनामा शुक्रवारी करण्यात येणार आहे. *जोराचा आवाज झाला आणि…* अनिरुद्ध बागवे हे त्यांच्या घराशेजारील किरण वायंगणकर यांच्या घरी चार वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्यांचवेळी जोरदार वारा सुटला होता. अकस्मात जोराचा आवाज होऊन पूर्ण झाड त्यांच्या घरावर कोसळताना त्यांनी पहिले. डोळ्यासमोर पूर्ण घरावर झाड कोसळताना पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
*पत्नी सुदैवाने बचावली*
यावेळी त्यांची पत्नी वैष्णवी या घरात काम करत होत्या. मोठा आवाज होऊन काही तरी कोसळते आहे याची जाणीव त्यांना झाली. परंतु घराबाहेर पडण्या अगोदरच त्या झाडाने पूर्ण घरचं आपल्या कवेत घेतले होते. पूर्ण छप्पर मोडून पडताना छपराची कौले त्यांच्या पायावर पडली. सुदैवाने त्या बचावल्याचे घटनास्थळाचे दृश्य पाहून जाणवत होते. ताबडतोब त्या घराबाहेर पडत सुरक्षित जागी आल्या. यावेळी त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा यश हा शाळेत होता. शाळेतून आल्यानंतर आपले घर पडल्याचे पाहून तो हबकून गेला होता. त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था शेजारील घरात करण्यात आली आहे.
*आर्थिक मदतीची गरज* अनिरुद्ध हे लॉकडाऊन मध्ये आपल्या कुटुंबासह गावी आले होते. मोलमजुरी व शेती करून ते आपला उदर निर्वाह चालवायचे. संपूर्ण घराच जमीन दोस्त झाल्याने पुन्हा घराची उभारणी करणे त्यांना अवघड आहे. शासनाची तातडीची मदत मिळण्या बरोबरच शासकीय योजनेमधून घर उभारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
यावेळी पोलीस पाटील सौ.प्रेरणा येसजी, संग्राम प्रभूगावकर, सचिन चव्हाण, शैलेश मसूरकर, भाई सुर्वे, राजू म्हाडगुत , रोहित म्हाडगुत, रोहन म्हाडगुत, गणपत सुर्वे, राजू सावंत, समीर सावंत, दिनेश बागवे, किरण वायगणकर, बापू परब, राहुल परब, पपू मुळीक, उमेश बागवे, अनिल सावंत, संदीप गोसावी, नीळकंठ शिरसाट, महेश बागवे आदी ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला.












