If the Lok Sabha elections are held today, it will be Modi again!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारवर विरोधकांकडून एकापाठोपाठ एक आरोप केले जात आहेत, विरोधक एकत्र येऊन भाजपसमोर लढण्रयासाठी दररोज नवनव्या रणनीती बनवत आहेत, मात्र अशा परिस्थितीत आज निवडणूक झाल्यास त्यात मोदीच सत्ता राखणार हे एका सर्व्हेतून समोर आले आहे. या सर्व्हेमधून आज लोकसभेची निवडणूक झाल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा पुन्हा एकदा बादी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्च यांनी हा सर्वे केला आहे. या सर्व्हेमधून विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व्हेत वर्तवलेल्या अंदाजानुसार आज लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपा आणि मित्र पक्षांना २९२ ते ३३८ जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना १०६ ते १४४ जागा मिळतील. तृणमूल काँग्रेसला २० ते २२ जागा मिळतील. तर इतर पक्षांच्या खात्यात ६६ ते ९६ जागा जातील, असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही भाजपा आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. भाजपा आणि मित्र पक्षांना ३८.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना २८.७ टक्के मते मिळतील. इतर पक्षांच्या खात्यामध्ये ३३.१ टक्के मते जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वात प्रबळ चेहऱ्याबाबत या सर्व्हेमधून विचारणा केली असता त्यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वरचढ असल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने ६४ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये आपला कल नोंदवला. तर १३ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली.
तर २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून २९ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली. तर १३ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी, १९ टक्के लोकांनी केजरीवाल तर ७ टक्के लोकांनी केसीआर आणि ८ टक्के लोकांनी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती दिली आहे. २०२४ मध्ये भाजपा पुन्हा एकदा ३०० जागा जिंकणार का, याला ४२ टक्के लोकांनी भाजपा ३०० हून अधिक जागा जिंकेल, सांगितले. तर २६ टक्के लोकांनी भाजपाला ३०० जागा जिंकणे कठीण जाईल, असे सांगितले.