If Sanjay Raut has the guts, he should meet… see who spoke directly
जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात येत्या रविवारी सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज जळगावात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता जळगावातील वातावरण तापताना दिसतंय. शिवसेनेचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.पण त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं.
“संजय राऊत यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय”, अशा घोषणाबाजी महिला कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या. “शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक हा गुलाबराव पाटील आहे हे लक्षात ठेवायचं. हेच संजय राऊत यांना आम्हाला सांगायचं आहे. आमच्या गावात येऊन आमच्याच पालकमंत्र्यांना तुम्ही चॅलेंज करतात? शिवसेना सर्वसाधारण लोकांची आहे. इथला प्रत्येक शिवसैनिक हा मंत्री आहे”, असं आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्या महिला म्हणाल्या. “आम्ही कफन बांधून फिरु. त्यांची हिंमत असेल तर फक्त आमच्या इतक्या लोकांना त्यांनी भेटून दाखवावं. संजय राऊत यांच्यात दम असेल तर त्यांनी भेटून दाखवावं. आपली लायकी काय आणि बोलतात काय? एवढं संपवलं ना?”, असे खोचक सवाल या महिलांनी यावेळी केले.