वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात दि. २४.०७.२०२४ पासून सुरू झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या २ दिवसांमध्ये २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८९९ गावे, ५९ उच्चदाब वाहिनीचे पोल, १८५ लघुदाब वाहिनीचे पोल व ३,८२,०४८ ग्राहक बाधित झाले होते.
त्यापैकी २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८८३ गावे, २३ उच्चदाब वाहिनीचे पोल, ५४ लघुदाब वाहिनीचे पोल व ३,७९,२५७ ग्राहक यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी, बावनदी, तरवळ-बौध्दवाडी , विल्ये-शीतपवाडी, सावडाव, मिलन, हासबे, जवळेथार, आजीवले, गोवळ, वाकेड, बोरथडे, इंदवटी, निवेशी, कुवे, पन्हळे गावांतील अंदाजे २४०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून, सदर वीज पुरवठा संध्याकाळ पर्यंत चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ३६ उच्चदाब वाहिनीचे पोल व १३१ लघुदाब वाहिनीचे पोल बाधित झाले असून त्यामुळे २७९१ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. सदर ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे असे जनसंपर्क अधिकारी, महावितरण यांनी कळवले आहे











