
पवार मंडळाच्या वारकरी दिंडीने वेधले लक्ष
राजापूर (वार्ताहर): शहरातील दिवटेवाडी भागातील घरगुती गणपतींना शुक्रवारी ढोल ताशाच्या गजरात लेझीमच्या तालावर मिरवणुक काढत पारंपारिक पध्दतीने निरोप देण्यात आला. यावेळी पवार मंडळाने काढलेल्या महिलांच्या वारकरी दिंडीने लक्ष वेधुन घेतले.
राजापूर तालुक्यात गौरी गणपती विसर्जनानंतर काही भागात शुक्रवारी गणपती विसर्जन करण्यात आले. शहरातील दिवटेवाडी भागातील गणपती परंपरेने सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी जवाहरचौक चौक मार्गे गणेश विसर्जन घाटापर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणुक काढण्यात आली.
यावेळी पवार मंडळ महिलांच्या वारकरी दिंडीने मिरवणुकीत आगळी रंगत भरली. पारंपारिक पेहरावात हातात टाळ आणि विठू नामाचा गजर करीत ही दिंडी काढण्यात आली.
सायंकाळी उशीरा गणेश विसर्जन घाटावर अर्जुना नदीपात्रात पारंपारिक पध्दतीने विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुक दिवटेवाडी भागातील अबालवृध्द भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.











