साखरपा भंडारवाडी येथे वाघाने केली कुत्र्याची शिकार

 

तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाघाने साधला डाव

साखरपा । वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडी येथील रहिवासी अभिजीत दत्ताराम वैद्य यांच्या चॅम्प नावाच्या कुत्र्याची शनिवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास वाघाने शिकार केली.
बिगल जातीचा चॅम्प कुत्रा दोन वर्षे पाच महिन्याचा होता.

 

गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये पहिल्या मजल्यावरील पोर्चमध्ये कुत्रा रात्री झोपलेला असताना आंब्याच्या फांदीवरून वाघाने पोर्चमध्ये उडी मारून कुत्र्याला लक्ष केले होते .मात्र कुत्रा ओरडू लागल्यानंतर अभिजीत यांनी बाहेर पाहिले असता त्यांना समोर वाघ दिसला त्यानंतर त्यांनी काठीच्या सहाय्याने वाघाला परतवून लावले.
यावेळी मात्र आंब्याची फांदी तोडली गेली असताना सुद्धा वाघाने खालील एका कठड्याचा आधार घेऊन पहिल्या मजल्यावरील पोर्चमध्ये जंप मारली आणि कुत्र्याला पकडून पळून गेला.
गेल्या तीन महिन्यांमधील परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्याची ही चौथी वेळ असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी साखरपा पंचक्रोशीतून होत आहे.