वेंगुर्ला न.प.हद्दीत मंत्री दीपक केसरकर यांनी दिली विकासाला चालना..

पथदीप बसविणे, सौर उर्जा प्रकल्पासह अनेक कामांचे झाले भूमिपूजन आणि लोकार्पण

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ला नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन व वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील विविध भागात पथदीप पोल बसविणे व वेंगुर्ला नगरपरिषद नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्‍ये सौर उर्जा प्रकल्‍प कार्यान्वित करणे या कामांचे लोकार्पण सोहळा तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या अग्निशमन केंद्राचे विकसन करणे व वेंगुर्ला नगरपरिषद मांडवी जेट्टीचे विकसन करणे, वेंगुर्ला नगरपरिषद व्‍यायामशाळा इमारतीचे विकसन करणे व वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पिराचा दर्गा येथील स्‍मशानभूमीचे सुशोभिकरण करणे या कामांचा भूमीपुजन समारंभ महाराष्‍ट्र राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री श्री.दिपक केसरकर यांच्या हस्‍ते संपन्‍न झाला. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामांना चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रशासक श्री. हेमंत निकम, मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ, जिल्‍हा नियोजन सदस्य श्री. सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष श्री. सुनील डुबळे, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख श्री. नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, श्री. प्रशांत आपटे तसेच वेंगुर्ला शहरातील बहुसंख्‍य स्‍थानिक नागरीक उपस्थित होते.
महाराष्‍ट्र अग्निसुरक्षा अभियान (राज्‍यस्‍तर) अनुदान योजनेतून अग्निशमन वाहनाचे खरेदी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये ५००० लिटर क्षमतेची पाण्‍याची टाकी, १००० लिटर क्षमतेची फोम बेस टाकी, १००० लिटर क्षमतेची फोम बेस टाकी, ४० फुट उंचीची शिडी, जादा पंपाची व्‍यवस्‍था, मॉपर, दोन गन पाईप व दोन अतिरिक्त पाईप लावून आग विझवण्‍यासाठी वापर करता येतो.

 

 

वैशिष्‍टयपुर्ण अनुदान योजनेतून १३६.०० लक्ष रकमेच्या वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील विविध भागात पथदीप पोल बसविण्‍यात आलेले असून शहरातील रस्‍त्‍यावरील स्‍ट्रीट लाईट संदर्भात विशेषतः पावसाळयात झाडे पडून लाईट नसण्‍याच्‍या समस्‍या कमी होणार आहे. ६० वॅट क्षमतेच्‍या एल.ई.डी. लाईटसह ७ मीटर उंचीचे आकर्षक १८१ पोल आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषद नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्‍ये सौर उर्जा प्रकल्‍प कार्यान्वित करणे या कामासाठी सिंधुरत्‍न समृध्‍दी विकास योजनेमधून रक्‍कम रुपये ३६.५० लक्ष एवढा निधी प्राप्‍त झालेला असून या प्रकल्पातून दररोज 40 KW सोलार विज निर्मिती केली जाणार आहे त्‍यामुळे नगरपरिषदेच्‍या वीज देयकांच्या खर्चावरील भार कमी होणारा आहे.

 

 

वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या अग्निशमन केंद्राचे विकसन करणे या कामासाठी वैशिष्‍टयपुर्ण अनुदान योजनेतून ६०.०० लक्ष निधी प्राप्‍त झालेला असून स्‍ट्रक्‍चरल डिजाईन करुन अग्निशमन केंद्राचे खराब झालेले पत्रे बदलणे, आकर्षक रंगकाम करणे, अग्निशमन वाहनाचे पाऊस आणि उनापासून संरक्षण व्‍हावे म्‍हणून व्‍यवस्‍था निर्माण करणे तसेच याठिकाणी दोन अग्निशमन वाहने एकाच वेळी पार्क करता येणारी आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषद मांडवी जेट्टीचे विकसन करणे महाराष्‍ट्र प्रादेशिक पर्यटन अनुदान योजनेतून मंजूर झालेले असून यासाठी ५०.०० लक्ष निधी प्राप्‍त झालेला आहे. जेट्टीची लांबी १४.७० मीटर असून रुंदी ९ मीटर आहे. या जेटीचा फायदा स्‍थानिक मच्छिमार व पर्यटकांना होणार आहे.

 

 

वेंगुर्ला नगरपरिषद व्‍यायामशाळा इमारतीचे विकसन करणे या कामासाठी वैशिष्‍टयपुर्ण अनुदान योजनेतून ३०.०० लक्ष निधी प्राप्त झालेला आहे. अत्‍याधुनिक ए.सी. व्‍यवस्‍था, टी.व्‍ही. व्‍यवस्‍था, साऊंड सिस्‍टीम व आकर्षक रबरी टाईल्‍ससह ही व्‍यायामशाळा अदययावत करण्‍यात येणार आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पिराचा दर्गा येथील स्‍मशानभूमीचे सुशोभिकरण करणे या कामासाठी वैशिष्‍टयपुर्ण अनुदान योजनेतून १०.०० निधी प्राप्‍त झालेला असून यामध्‍ये नागरीकांना प्रार्थना करण्‍यासाठी ९ मीटर लांबी व ४.५ मीटर रुंदीच्या शेडचे बांधकाम करण्‍यात येणार आहे. आकर्षक कमान, सुसज्‍ज बैठक व्‍यवस्‍था, पाण्‍याची आणि लाईटची व्‍यवस्‍था तसेच आवश्‍यक त्‍या ठिकाणी पेव्‍हर ब्‍लॉक बसविणेत येणार आहेत.