खेडमधील वेरळनजीकच्या चौपदरीकरणावर मातीचा मुलामा

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावर भरणे मध्यवर्ती ठिकाणासह वेरळ- रेल्वेस्थानक फाटानजीकचा रस्ता पुरता खड्डयात गेला आहे. या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यादरम्यान ठेकाधारक कंपनीने रातोरात खड्डे बुजवून मलमपट्टी केली. मात्र मातीने बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहे.यामुळे वाहने घसरण्याचा धोका कायम आहे.

वेरळ – रेल्वेस्थानक फाटा येथेही खड्डे पडले आहेत. याठिकाणचे चौपदरीकरणही रखडले आहे. ठेकाधारक कंपनीने दोनच दिवसापूर्वी खड्डे बुजवत मार्ग सुस्थितीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र मातीने बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले असून पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. चिखलमिश्रित मार्गामुळे अपघातांचा धोकाही कायम आहे.