मळगांव घाटीत झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव घाटीतील मुख्य वळणावर असलेल्या धबधब्यालगत काही अंतरावर एक भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यानंतर वाहनधारकांनी याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांच्यासह वन कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक वाहन चालक तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड दूर केले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

दैनिक प्रहार तसेच प्रहार डिजिटल मधून कालच मळगाव घाटीतील झाडे वाहनधारकांसाठी मृत्यूची टांगती तलवार या आशयाची बातमी प्रसारित करण्यात आली होती. मळगाव वाटीत अनेक झाडे धोकादायक स्थितीत असून कधीही पडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रहार ने वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर लगेचच एक झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वनविभागाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी आता वाहनधारक तसेच स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.