
सुदैवाने रुग्ण महिलेसह तिघेजण बचावले
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील जूना शिरोडानाका येथे असलेल्या एका खाजगी रुग्णालयातून आपल्या आईवर उपचार करून मारुती व्हॅनमधून परतत असताना रुग्णालयाच्या रॅमवर गाडी लगतच्या कठड्याला धडकून पलटी झाली. त्या अपघातात चालक कीस्तू फर्नांडीस यांच्यासह त्यांची वृद्ध आई व अन्य दोन महिला गाडीत अडकून पडले. मात्र, अपघातानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. सुदैवाने या चौघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
होडावडा येथील कीस्तू फर्नांडीस हे घरात पडून जखमी झालेल्या आपल्या आईला सावंतवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले होते. उपचारानंतर आपल्या मारुती व्हॅनने ते आईला घेऊन रुग्णालयातून परत फिरले. रुग्णालयालगत असलेल्या मोठ्या रॅमवर व्हॅन मागे घेत असताना पावसामुळे आलेल्या शेवाळामुळे निसरड्या झालेल्या रॅमवर गाडी सरकली व लगतच्या भिंतीला धडकून अक्षरशः एका बाजूने पलटी झाली.
यावेळी या गाडीत कीस्तु फर्नांडिस यांच्यासह त्यांची त्यांची आई, पत्नी आणि तळवडे येथील एक महिला व्हॅनमध्ये अडकली.
अपघात झाल्याचे पाहताच रुग्णालयात लगत असलेल्या नागरिकांनी तसेच समोरच असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम तसेच पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरवाजा उघडून शर्तीचे प्रयत्न करून आत अडकलेल्या तिन्ही महिलांना प्रथम बाहेर काढले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती.
गाडी चालक किस्तू फर्नांडिस हे मात्र गाडीत बराच वेळ अडकून पडले होते. गाडीच्या स्टेरिंग मध्ये त्यांचा पाय अडकल्याने त्याला बाहेर काढता येत नव्हते. अखेर अथक प्रयत्नांती त्यांना बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने त्यांनाही कोणती दुखापत झाली नव्हती.
यानंतर नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने गाडीला एका झाडाला बांधत सर्वांनी मिळून उचलून गाडी उभी केली. त्यानंतर सदरची व्हॅन सुरक्षितरीत्या रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, अपघातग्रस्तांना सुरक्षितरित्या वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले.
मदत कार्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमित कल्याणकर, संजय म्हापसेकर, रुपेश सावंत, शुभम कवळणकर, हितेन नाईक, सचिन रेडकर, शेख, डिसोजा, अमेय नाईक आदींसह नागरीकांनी सहकार्य केले.











