५ मंडळ अधिकारी आणि १३ तलाठी कार्यालयांचा कारभार लवकरच नव्या कार्यालयातून हाकणार

 

या सर्व इमारतींसाठी २ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचे प्रस्ताव शासनाकडे सादर

संतोष कोत्रे | लांजा -: तालुक्यातील ०५ मंडळ अधिकारी आणि १३ तलाठी कार्यालयांचा कारभार लवकरच नव्या कार्यालयातून हाकला जाणार आहे. या सर्व इमारतीं साठीच्या २ कोटी ७० लाख रुपयांचे प्रस्ताव हे लांजा तहसील कार्यालय मार्फत शासनाला सादर करण्यात आले आहेत .

 

 

तालुक्यातील शासकीय जागेत असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीबाबत निधीची तरतूद व्हावी याबाबतचे प्रस्ताव शासनाकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार लांजा तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील एकूण ५ मंडळ अधिकारी आणि १३ तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव हे लांजा तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले आहेत अशी माहिती तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली .

 

 

प्रस्ताव पाठवण्यात आलेल्यामध्ये मंडळ अधिकारी कार्यालय लांजा, मंडळ अधिकारी कार्यालय साटवली ,मंडळ अधिकारी कार्यालय भांबेड, मंडळ अधिकारी कार्यालय विलवडे आणि मंडल अधिकारी कार्यालय पुनस तर तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी कार्यालय लांजा, वेरवली बुद्रुक, साटवली, वाडीलिंबू, माजळ, मठ, कोट ,भांबेड, प्रभानवल्ली , विलवडे ,रिंगणे ,कोंडगे, व पुनस यांचा समावेश आहे.या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या पुनर्बांधणी दुरुस्तीसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधीचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे लवकरच ही सर्व कार्यालये नवीन इमारतीतून आपला कारभार पाहणार आहेत.