पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं काळबेरं हेरलं, बॅग उघडताच सारेच जण हादरले
खेड । देवेंद्र जाधव
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक व्यक्ती सोमवारी सकाळी एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. या बॅगेत रक्ताने माखलेला एक मृतदेह होता. या घटनेमुळे दादर स्थानकात एकच खळबळ उडाली होती.
कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. ही हत्या पायधुनी परिसरात घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अवघ्या चार तासांत या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून त्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
दादर रेल्वे स्थानक हे वर्दळीचे ठिकाण… प्रवाशांची येजा मोठ्या प्रमाणावर सुरूच असते… अशातच फलाट क्रमांक 11 वर दोघेजण एक भलीमोठी चाके असलेले बॅग तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढवायचा प्रयत्न करत होते. बॅग बहुदा भलतीच जड होती. दोघे असूनही तिला रेल्वेत चढवायला दोघांना घाम तर फुटला होताच पण दोघांच्या चेहऱ्यावर भीतीच चिन्हेही दिसत होती. लोकांच्या नजरा चुकवून हे काम त्या दोघांना करायचे होते. पण नेमकी हीच बाब तिथे उभे असलेल्या दोघा रेल्वे पोलिसांना खटकली. म्हणून पोलिसांनी त्यांना हटकले आणि बॅग उघडून दाखवायला सांगितलं. बॅग उघडल्यावर जे दिसले ते पाहून सगळेच जण हादरले.
त्या भल्यमोठ्या बॅगेत एका माणसाचा मृतदेह भरलेला होता आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये ती बॅग नेऊन त्याची कोकणातील जंगल भागात त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची त्यांचा कट होता. विशेष म्हणजे दोघेही मूकबधिर असल्याने त्यांच्याशी बोलतानाही अडचणी येत होत्या. त्यात हे सगळं सुरु असतानाच त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले आणि त्यानंतर या बॅगेचे आणि त्यातील मृतदेहाचे रहस्य उलगडले. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे आणि पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (वय 30) याचा असल्याचे समजले. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना परिसरात राहायला होता. शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिरांनी सादिक अली शेख याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याच्या मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचे ठरवले होते. त्यासाठी दोघांनी अर्शदचा मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्स्प्रेसने कोकणात निघाले होते. मात्र, पोलिसांनी संशय येऊन त्यांनी दोघांना हटकल्याने हा सगळा प्रकार उघडकीला आला.
प्राथमिक तपासात शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केल्याचे समजले. शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी प्रवीण चावडा याच्याकडून माहिती घेऊन त्याला उल्हासनगरमधून ताब्यात घेतले. गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.












