
लांजा (प्रतिनिधी) लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सलग चौथ्या वर्षी तृतीय क्रमांकाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा हैद्राबाद येथे पार पडला.
लांजा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात लांजा नागरी पतसंस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली बत्तीस वर्षे सभासद आणि ग्राहकांची प्रामाणिक आणि विनम्रपणे सेवा बजावत आहे. संस्थेला सतत अ ऑडीट वर्ग प्राप्त असून सीडी रेशोचे प्रमाण तसेच थकबाकीचे प्रमाण शासन निकषाप्रमाणे मर्यादित ठेवलेले आहे. संस्थेचे संपूर्ण व्यवहार संगणकीकृत असून संपूर्ण कामकाज ऑनलाइन पद्धतीने नेहमी सुरू आहे. संस्थेकडे एन एफ टी, आरटीजीएस, ट्रान्सफर सुविधा चालू आहेत. तसेच संस्थेने स्वतःचा क्यु आर कोड केला असून संस्थेचे असंख्य ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे. आज अखेर संस्थेच्या ठेवी ३१ कोटी ३९ लाख रुपयांच्या आहेत. तालुक्यात संस्थेच्या सापुचेतळे, भांबेड व साटवली येथे शाखा सुरू आहेत.
लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला १० कोटी ते ५० कोटी ठेवी पर्यंतच्या विभागात कोकण विभागातून राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार पटकावून संस्थेने आपल्या नावलौकिकात भर घातली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा हैद्राबाद येथे रामोजी फिल्मसिटी या ठिकाणी पार पडला.मान्यवरांच्या हस्ते संस्थेला या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे, व्हाईस चेअरमन सौ. संपदा वाघदरे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ,कर्मचारी आणि सर्व पिग्मीव रिकरींग एजंट यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










