खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील तुळशी – धनगरवाडीतील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निधीची उपलब्धता करुन दिल्यानंतर जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या पाणी योजनेमुळे तब्बल ७८ वर्षानंतर ग्रामस्थांना वर्षानुवर्षे सतावणारी पाणीटंचाईची समस्या कायमचीसंपुष्टात आली आहे.
दुर्गम भागात असलेल्या तुळशी- धनगरवाडी येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. रस्त्याअभावी पाण्याचा टँकर देखील धनगरवाडीपर्यंत पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. ही बाब ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार असताना निदर्शनास आणून दिली. याची गंभीर दखल घेत २ वर्षातच रस्ते व पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार गृहराज्यमंत्री कदम यांनी निधीची उपलब्धता करून दिली. निधी प्राप्त होताच नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाल्याने मुबलक प्रमाणात ग्रामस्थांसाठी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या नळपाणी योजनेचा फायदा तुळशी- धनगरवाडी येथील १४ घरांना होणार आहे. तब्बल ७८ वर्षानंतर धनगरवाडीतील ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरुपी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला.










