आरवली हायस्कूल मध्ये रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन

 

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यतील स्व.दाजी परकर यांच्या श्रीदेव केदारनाथ विद्या मंदिर आरवली मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री चैतन्य परकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य मा. श्री. राजन पिलणकर यांची उपस्थित होते.आरवली केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी या प्रदर्शनासाठी भेट घेतली. इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये निसर्गतः उगवलेल्या व उपलब्ध असलेल्या भारंगी, टाकळा, आकुर, अळू, पाथरी, सुरण पाने, शेगल सुरणाचा कांदा, गोमेटा, ढोमळा , कुर्डू, केळफूल, कवळा, आदी रान भाज्यांचे प्रदर्शन मांडले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री राजन पिलणकर यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक परंपरा व संस्कृती संवर्धनासह रानभाज्या व रानमेवा सेवन करण्याचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रदर्शनात आणलेल्या रानभाज्यांची ओळख करून दिली व रानभाज्यांचे सेवन केल्याने होणारे फायदे सांगितले. रानभाज्या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देवयानी फणसे ग्रुप व श्रद्धा गुरव ग्रुप, द्वितीय क्रमांक जय जाबरे ग्रुप व अनुष्का बाटे ग्रुप, तृतीय क्रमांक श्रुती फणसे ग्रुप व संस्कृती खोचाडे ग्रुप असे विभागून देण्यात आले तसेंच उत्तेजनार्थ सुजल बाटे ग्रुप यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप बोथले सर यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. अमोल सरनोबत यांनी केले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. स्वरूपा कनगुटकर यांनी केले तर आभार सौ. विजया चोरगे यांनी मानले.