आंतरशालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धेत माने इंटरनॅशनल, जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रथम

नवनिर्माण हाय’च्या वतीने आयोजन

*रत्नागिरी :* येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरशालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट, तर माध्यमिक गटात माने इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.

क्रांती दिनाचे औचित्य साधून येथील नवनिर्माण हायतर्फे आज (९ ऑगस्ट) आंतरशालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. हे या स्पर्धेचे सलग ११ वे वर्ष होते. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत आयोजित या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातून अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, तर बक्षीस वितरण समारंभ भारतीय तटरक्षक दलाचे डेप्युटी कमांडर गौरव सिंघल आणि नाविक सचिन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, सहभागी शाळांमधील संगीत शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण गायिका राधा भट आणि निहाली गद्रे यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी स्पर्धेत नंबर नाही आला तरी चालेल पण स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी चव्हाण यांनी केले. लुबना दवे यांनी आभार मानले.

बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे डेप्युटी कमांडर गौरव सिंघल यांनी देशभक्ती गीते ही केवळ गाणी नसून, तो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा, त्यांच्या लढ्याचा आणि त्यागाचा इतिहास असून, त्या भावना असल्याचे नमूद केले. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सहानी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नाझिया माजगावकर यांनी करून दिला. शीतल कांबळे यांनी आभार मानले.

यावेळी सौ. हेगशेट्ये, मुख्याध्यापक डॉ. पाटील यांच्यासह परीक्षक राधा भट आणि निहाली गद्रे यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले.

*स्पर्धेचा निकाल असा :* *प्राथमिक गट -* जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट (प्रथम), नवनिर्माण हाय (द्वितीय), एम. एस. नाईक हायस्कूल (तृतीय). *माध्यमिक गट -* माने इंटरनॅशनल स्कूल (प्रथम), नवनिर्माण हाय (द्वितीय), एम. एस. नाईक हायस्कूल (तृतीय), उत्तेजनार्थ – पटवर्धन हायस्कूल, जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट.

*वैयक्तिक बक्षीसे :* उत्कृष्ट बासरीवादन सर्वज्ञ पाटोळे (जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट), उत्कृष्ट हावभाव – परिणीता सावंत (डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल), उत्कृष्ट तबला वादन – प्रणव तांदळे (जगदगुरु नरेंद्राचार्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट), उत्कृष्ट हार्मोनियम वादन – ऋषीकेश मोंडकर (पटवर्धन हायस्कूल).